पालिकेकडून तयार केली जात आहे रस्त्यांची “कुंडली’

रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली ठरतेय फायदेशीर
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – महापालिकेकडून शहरात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची शास्त्रोक्त पध्दतीने माहिती संकलीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पथ विभागाकडून रस्ते मालमत्ता व्यवस्थापन (आरएएमएस) प्रणाली राबविली जात असून या प्रामुख्याने रस्त्यांबाबत असलेली सर्व माहितीचे संकलन आणि त्या माहितीवरून रस्त्याच्या भविष्यातील कामांचे व्यवस्थापन केले जात आहे. या मुळे पथ विभागास एका क्‍लीकवर रस्त्यांसाठी आवश्‍यक असलेली दुरूस्ती आणि देखभालीसाठीचा प्राधान्यक्रम ठविण्यात मोठी मदत होत आहे. तीन महिन्यांपासून ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
शहरात महापालिकेने विकसित केलेले सुमार 2100 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात सर्वसाधारणपणे 6 मीटर, 9 मीटर, 12 मीटर, 15 मीटर, 18 मीटर, 24 मीटर, 30 मीटर, 36 मीटर आणि 42 मीटर पर्यंत रूंदीचे रस्ते आहेत. हे रस्ते महापालिकेच्या मुख्य विभागाकडून तयार केले जात असले तरी 12 मीटर पेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांचे व्यवस्थापन क्षेत्रीय कार्यालयांकडून पाहिले जाते. या पूर्वी एकदा रस्ता तयार केल्यानंतर त्याची एकत्रित माहिती संकलीत केली जात नव्हती. पथ विभागाचा ज्या अधिकाऱ्याच्या विभागात हा रस्ता तयार केलेला आहे. त्याच्याकडेच ती माहिती असायची. त्यामुळे कोणता रस्ता कधी केला, त्याची देखभाल दुरूस्ती कधी केली, त्यावर किती खर्च झाला, रस्त्याच्या खाली कोणकोणत्या सेवा वाहिन्या आहेत. त्या रस्त्यापासून किती अंतरावर खाली आहेत. रस्त्यावर पदपथ तसेच पावसाळी गटारे अथवा ड्रेणेज आहेत का याची एकत्रित माहिती कोठेही नव्हती. ही बाब लक्षात घेऊन रस्त्यांबाबत सर्व माहीती एकाच क्‍लीक वर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही प्रणाली पथ विभागाकडून राबविली जात असल्याची माहीती पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली.
————
काय आहे आरएएमएस प्रणाली
या प्रणालीमध्ये रस्त्यांबाबतची शिस्तबद्ध माहिती संकलन करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. सर्व श्रेणीतील रस्त्यांची माहिती या प्रणालीमध्ये गोळा करण्यात आलेली आहे.रस्ते विभागाकडे मर्यदित स्रोत उपलब्ध असतात. या प्रणालीमुळे रस्ते विभागाला दुरुस्ती आणि देखभालीसाठी रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत होते.देखभाल स्रोतांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि नियंत्रण राखण्यासाठी या प्रणालीचा वापर होतो.यामध्ये माहितीच्या आधारावर प्रत्येक विभागातील रस्त्यांसाठी देखभाल निधीचे वाटप केले जाते.रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी नेमका किती खर्च लागतो हे तपासण्याचा मुख्य उद्देश ही प्रणाली वापरण्यामागे आहे.
—————–
प्राधान्य क्रम ठरविण्यास होणार मदत
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी शहरात नवे रस्ते विकसित करणे तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी तब्बल 300 ते 400 कोटींचा खर्च प्रस्तावित केला जातो. पथविभागाकडून त्यातील 90 टक्के खर्च दरवर्षी केला जातो.मात्र, तो नेमक्‍या कामांवर न होता. नगरसेवकांकडून केल्या जाणाऱ्या मागणीनुसार, होतो त्यामुळे अनेकदा आवश्‍यकता नसतानाही डांबरीकरण करणे, सेवा वाहिन्यांसाठी वारंवार खोदाई करून दुरूस्त करणे, पेव्हर ब्लॉक बदलणे, पदपथ दरवर्षी तयार करणे अशी कामे करून हा निधी खर्ची पाडला जातो. मात्र, आता संबधित रस्त्यावर कोणते काय कधी केले आहे आणि ते किती दिवस टिकेल हे समजू शकले असल्याने अंदाजपत्रकात नेमक्‍या आणि आवश्‍यक कामांनाच निधी उपलब्ध करून घेण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)