पालिका सर्वसाधारण सभेस मुख्याधिकारी शंकर गोरे गैरहजर

-स्वच्छ भारत अभियानाची बिलाची पोलखोल; खंदारेंकडून मनोमिलनाचे आवाहन
-आठ विषयांना मंजुरी ; मोने-ऍड.बनकरांमध्ये जुंपली

सातारा – तब्बल 365 दिवसाच्या खंडानंतर नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या कारभारावर शुक्रवारी टीकेची तुफानी झोड उठवली. गोरे यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तब्बल तीस तक्रारी दाखल आहेत. गोरे यांचे आजारपण राजकीय असून दोन्ही आघाड्यांना व प्रसार माध्यमांना उत्तर द्यायला ते घाबरतात , असा घणाघात खंदारे यांनी केला.

खासदार व आमदार यांनी साताऱ्याच्या भल्यासाठी एकत्र यावे असे आवाहन करत पांढऱ्या पट्टीने त्यांनी स्वतःचे तोंड बांधून घेतले. मंगळवार तळ्यावरील वाचनालयावरून सभागृहात जोरदार रणकंदन झाले. ग्रेड सेपरेटरचे काम किती दिवस चालणार आहे ? असा प्रश्न अशोक मोने यांनी उपस्थित करून सातारकरांच्या खदखदीला मोकळी वाट करून दिली. साताऱ्यात रस्त्यांची काय अवस्था आहे? बाधित झालेल्या रस्त्यांना साधे पॅचिंग सुध्दा नाही असा रोखठोक सवाल मोने यांनी केला. शुक्रवारी छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत आठ विषयांना मंजूरी देण्यात आली.

सातारा पालिकेत सत्ताधारी आणि विरोधी आघाडी मधील राजकारणामुळे सातारा पालिकेचा कारभार चर्चेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी दोन्ही आघाडी मधील नगरसेवकांच्या राजकारणामुळे झाल्या आहेत. नगरसेवकांच्या भीतीने मुख्याधिकारी शंकर गोरे आज सर्वसाधारण सभेला हजर राहिले नाहीत. सातारकर जनता वैतागली आहे.

जनमतावर परिणाम होण्यापूर्वी दोन्ही आघाडीतील नगरसेवकांमध्ये हिम्मत असेल तर खा. उदयनराजे शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा एकत्र आणावे असे आवाहन नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी आज शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी सभागृहात केले. दरम्यान भाजप नगरसेवक मला माफ करा पण या दोन देवांना मला एकत्र आलेले बघायचे आहे.

लोकसभा, विधानसभा आल्या आहेत. दोन भावांना एकत्र आणा अशी दोन्ही आघाडीमधील सर्व नगरसेवकांना माझी हात जोडून विनंती आहे. आता यापुढे मी काही बोलणार नाही; असे सांगत त्यांनी तोंडावर महाराज लिहलेली पट्टी बांधली. या स्टंटचा सभागृहात जोरदार बोलबाला झाला. बाळासाहेब खंदारे यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी हस्तक्षेप केल्यानंतरही पालिकेच्या कारभारावर जोरदार टिका केली.

स्वच्छ भारत अभियानाच्या बिलांच्या संदर्भातही भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांनी पुराव्यानिशी पोलखोल केल्याने सातारा विकास आघाडी चांगलीच अडचणीत आली. मागील सभेमध्ये चुक करणाऱ्याने माफी मागावी असे ठरले होते. त्याचा संदर्भ काटवटे यांनी घेत आता कोणी माफी मागायची ? हा प्रश्‍न उपस्थित केला. सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या विषयावर ऍड. दत्ता बनकर व विरोधी पक्षनेते अशोक मोने यांची चांगलीच जुंपली.

सदर जागेवर टाऊन हॉलचे आरक्षण असताना स्पर्धात्मक आराखडे मागावून कशाला चुकीच्या कारभाराचा पायंडा पाडताय असा रोखठोक सवाल मोने यांनी केला. ऍड. बनकर यांनी आरक्षण उठले आहे, उगाच चांगल्या विषयाला विरोध करू नका असे सांगत मोने यांची समजुत काढली. सरतेशेवटी विषय मतदानाला गेल्यानंतर तो. 19 विरूध्द 16 मतांनी मंजुर झाला. मंगळवार तळ्यावरील अभयसिंहराजे भोसले सार्वजनिक वाचनालयावरूनही जोरदार वादावादी झाली.

नगरसेवक वसंत लेवे यांनी चौकशी समिती अहवाल कधी सादर करणार आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. हा प्रश्‍न अधिक ताणला जाऊ नये अशी बाजू समिती सदस्य मोने यांनी मांडताच लेवे यांनी आक्षेप घेतला. पालिकेचे नुकसान करणाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करा अशी मागणी त्यांनी केली. मुख्याधिकारी गेल्या दोन सभांना हजर नसल्याने या प्रकरणाचा तांत्रिक तपशील उपलब्ध झालेला नाही. तो उपलब्ध झाल्यावर अहवाल सादर होईल असे उत्तर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी देत या वादा-वादीवर पडदा टाकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)