पालिका शाळांत अत्याधुनिक पद्धतीने मिळणार पोषण आहार

ठेका “अक्षयपात्र’कडे : प्रायोगिक तत्त्वावर केला जाणार पुरवठा

पुणे – महापालिका शाळांत पुरवठा करणाऱ्या पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक आणि पदाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी तक्रारी आल्याने बचत गटांना हे काम देण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांना हे काम देण्याचा विचार सरकारतर्फेच करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अत्याधुनिक पद्धतीने पोषण आहार मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोषण आहार पुरवठ्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर “अक्षयपात्र’ या स्वयंसेवी संस्थेला पोषण आहार देण्याचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांना पुरेसा आहार न देणे, भातामध्ये धान्यादी आणि भाजीपाल्याचे प्रमाण कमी असणे, ठरवून दिलेल्या मेनूनुसार आहार न देणे, विहित उष्माकांचा दर्जेदार आहार न देणे, आहार वाटपाचे काम विद्यार्थ्यांना करायला लावणे, बचतगटांमधील सदस्यांव्यतिरिक्त इतर महिलांनी आहार शिजविणे, तसेच स्वयंपाकघर अस्वच्छ असणे, पाण्याची साठवणूक अस्वच्छ भांड्यात करणे अशा तक्रारी बचतगटांच्या बाबतीत केल्या गेल्या होत्या.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आरोग्यदायी आणि गरम आहाराचा पुरवठा करणे गरजेचे असल्याने तशा आहाराचा पुरवठा करणाऱ्या शिवाय त्यांच्या स्वतःच्या निधीतून (सीएसआर, पब्लिक डोनेशन) आहाराची गुणवत्ता वाढवून चांगला आहार देणाऱ्या “अक्षयपात्र’, “अन्नामृत’ यासारख्या स्वयंसेवी संस्थांची माहिती घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

“अक्षयपात्र’ संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावांचा शासनाकडून मिळणारे अनुदान आणि तांदूळ तसेच स्वतःच्या निधीतून प्रतिविद्यार्थी आठ रुपये खर्च करून दर्जेदार, आरोग्यदायी आणि गरज आहाराचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्याकडे स्वामी विवेकानंद इंडस्ट्रिअल इस्टेट, हांडेवाडी या ठिकाणी किचनसाठी 20 हजार चौरस फूट इतकी जागा उपलब्ध आहे.

“अक्षयपात्र’ संस्थेने ठाणे मनपा व नागपूर मनपा कार्यक्षेत्रातील स्वयंपाकगृह आधुनिक पद्धतीचे असून स्वयंचलित उपकरणांच्या माध्यमातून निर्जंतुक, आरोग्यदायी अन्न शिजविले जाते. तसेच स्वयंचलित पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये भरून अन्नाला कोणाचेही हात न लागता चार तासांच्या आत विद्यार्थ्यांना ताटातून अन्न वाटप केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्जंतुक, कॅलरीयुक्त आहार दिला जातो, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे विद्यार्थी संख्या
“अक्षयपात्र’ संस्थेस हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयातील 26 मनपा शाळांतील अकरा हजार विद्यार्थी आणि कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील 6 महापालिका शाळांतील 3 हजार 800 विद्यार्थी तसेच वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील 22 महापालिका शाळांतील 8 हजार विद्यार्थी असे महापालिका शाळेतील एकूण 22 हजार 800 विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शालेय पोषण आहार पुरवठा करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)