पालिका शाळांतही “दप्तरविना शनिवार’

जिल्हा परिषदेच्या धर्तीवर निर्णय : पुढील आठवड्यात बैठक

पुणे – आता महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमध्येही “दप्तरविना शनिवार’ उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा सुरू केल्याची माहिती शिक्षण विभाग प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालिका शाळांमधील मुलांची उपस्थिती शनिवारी लक्षणीय घटत असल्याने हा निर्णय घेतल्याचे दौंडकर यांनी सांगितले. शहरात महापालिकेच्या सुमारे 287 शाळा असून त्यात बालवाडी ते दहावीपर्यंत जवळपास 1 लाख मुले शिक्षण घेतात. मात्र, मुलांची उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय राहिल्याने खासगी शाळांप्रमाणेच दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गेल्या काही वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यात मुलांच्या सर्वांगीन विकासासह व्यक्‍तिमत्त्व विकासाचे उपक्रमही स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून राबविले जातात. मात्र, पालिकेच्या शाळांमधील बहुतांश मुले ही आर्थिक दुर्बल कुटूंबातील असल्याने पालक रविवारच्या सुट्टीसह, शनिवारीही मुलांना आपल्यासोबत कामासाठी मदतीला घेतात. त्यामुळे ही मुले शनिवारी शाळेत येत नाहीत. तसेच शनिवारी अर्धी शाळा असल्याने मुलांचा कलही शाळेकडे नसतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने राबविलेल्या “दप्तरविना शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या अनुषंगाने मुख्याध्यपकांना सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून अभिप्राय तसेच मुलांसाठी प्रत्येक शनिवारी कोणकोणते उपक्रम राबविता येतील, याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यात मुख्याध्यापकांची बैठक घेऊन हा उपक्रम राबविण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे दौंडकर म्हणाले.

मॉडेल स्कूलला चांगला प्रतिसाद
जिल्हा परिषदेच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असला, तरी पालिकेकडून सुमारे 20 शाळा मॉडेल स्कूल म्हणून उभारण्यात आल्या आहेत. त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एक दिवस दप्तरविना हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दौंडकर यांनी स्पष्ट केले. मात्र, हा उपक्रम त्या शाळांपुरताच होता. तो आता सर्व शाळांमध्ये राबविला जाईल.

“दप्तरविना शनिवार’ उपक्रम सुरू करण्यापूर्वी मुलांना या दिवशी व्यक्‍तिमत्त्व विकास तसेच इतर कोणत्या घटकांचे प्रशिक्षण अथवा मार्गदर्शन करता येईल, याबाबत मुख्याध्यापकांकडून संकल्पना मागविण्यात येत आहेत. हे उपक्रम शालेय अभ्यासक्रमाबाहेरील असतील.
– शिवाजी दौंडकर, शिक्षण विभाग प्रमुख, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)