पालघर – बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी लागल्याने जावयाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पालघरमध्ये घडली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून मेहुणा लहान्या भोईर याला अटक करण्यात आली आहे.
हरी बच्चू गडग (वय 39 वर्षे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हरी हे पत्नी आणि मुलासह बोईसरमधील शिगाव सुमडीपाडा येथे दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते. शुक्रवारी रात्रीचे जेवण झाल्यावर मेहुणा लहान्या भोईर आणि हरी गडक हे एका खोलीमध्ये गप्पागोष्टी करत होते. यावेळी बंदूक उत्सुकतेने दाखविताना चुकून खटका दाबला गेल्याने गोळी थेट हरी गडग यांच्या छातीत घुसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार घडल्यानंतर काय करावे हे न सुचल्याने त्यांचा मृतदेह रात्रभर तिथेच होता. यानंतर हरी यांचा पुतण्या सागर गडग याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर, आरोपी लहान्या भोईर याला अटक केली. विशेष म्हणजे, ही बंदूक अनधिकृत होती. याबाबतची चौकशी पोलिसांनी भोईरकडे केली.
ही बंदूक रोहित जयराम तांबडा याची असल्याची सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन, बंदूक हस्तगत केली. पोलिसांनी आरोपी लहान्या भोईर आणि रोहित जयराम तांबडा या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 304 सह आर्म्स ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पालघर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 16 नव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा