पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

नवी दिल्ली : पालघरमधील भाजपचे खासदार, अॅड. चिंतामण वनगा यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी चिंतामण वनगा नवी दिल्लीत आले होते. कालपासूनच त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. आज पुन्हा त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना सकाळी साडे दहा वाजता तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

चिंतामण वनगा तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर १९९९ मध्ये ते डहाणू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर २०१४ मध्ये पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पराभूत करुन खासदार झाले. व्यवसायाने वकील असलेले चिंतामण वनगा यांनी १९९० ते १९९६ या काळात भाजपचे ठाणे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तसंच ते महाराष्ट्रातील भाजप आदिवासी सेलचे प्रमुखही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)