पालखी महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातात वाढ

सासवड- सासवड शहरातुन राष्ट्रीय पालखी महामार्ग जातो. या महामार्गावर सासवड शहरातील बसस्थानक ते पोलीस स्टेशन दरम्यान होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक नसल्यामुळे वाहन चालकांचे वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसते. भरधाव वेगात येणाऱ्या या वाहनांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच रोज किरकोळ स्वरूपाचे अपघात ही तर सासवडकरांना नित्याचीच बाब बनली आहे. पालखी महामार्गावरील हॉटेल व्यासायिकांनी केलेल्या अवैध पार्किंगमुळे अपघातात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
सासवड शहरातील वाहतुकीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. पवारवाडी ते बोरावके मळा दरम्यान पालखी महामार्गास दुभाजक नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रसिध्द खंडोबा देवस्थान जेजुरी, मोरगाव, वीर, नारायणपूर, केतकवळे या पर्यटन व धार्मिक स्थळाकडे जाण्याकरीता वाहन चालकांना सासवड मधुनच जावे लागते. त्यामुळे सासवडकरांना वाहतुकीची कोंडी व अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानक ते सासवड पोलीस स्टेशन यादरम्यान गतिरोधक व ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
याबाबत सासवड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदर रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग झाल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहेत. सासवड मध्ये पीएमटीची बस याच महामार्गावर थांबविल्या जातात. यामुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळे अशा बसचालक व वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सासवडकर करीत आहेत.
अवैध पार्किंगवर कारवाईची मागणी
सासवड शहरातुन जाणाऱ्या पालखी महामार्गालगत अनेक हॉटेल आहेत. त्यांनी रस्त्यावरच पार्किंगची सोय केल्यामुळे पीएमपीएमएलच्या प्रवाशांना जीव धोक्‍यात घेउन महामार्गावरच बसची वाट पाहत उभे रहावे लागते. त्यामुळे अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)