पालखीसोहळ्यासाठी प्रशासनासह बारामतीनगरी सज्ज

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ : शुक्रवारी तालुक्‍याच्या हद्दीत, तर शनिवारी शहरात मुक्काम

बारामती, दि. 20 (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळा शनिवारी (दि. 24) बारामतीत मुक्कामासाठी येणार आहे, त्यामुळे या सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनासह बारामती नगरी सज्ज झाली असून, ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह वारकऱ्यांच्या सेवेची विविध दालने गुरुवार, शुक्रवारपासून सजणार असून त्याची तयारी बारामतीत सुरू आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या दोन-तीन दिवस आगोदरच बारामती भक्‍तीरसात न्हाहून निघणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेबाबत दक्ष राहा- प्रांतधिकारी
बारामती तालुक्‍यात श्री संत तुकाराम महाराज व सोपानकाका पालखी सोहळ शुक्रवारी (दि. 23) बारामती तालुक्‍यात प्रवेश करणार आहे.  शनिवारी बारामती शहरात दाखल होत असून शनिवारी रात्रीचा मुक्काम बारामतीतच असणार आहे, त्यामुळे पालखी वास्तव्य कालावधीत सुरक्षा व्यवस्थेबाबत अत्यंत दक्ष राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या. श्रीसंत तुकाराम महाराज व सोपानकाका पालखी सोहळा आढावा बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत येथे झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका आरोग्य अधिकारी महेश जगताप, आगार प्रमुख सुभाष धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, महावितरणचे अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे, मंडल अधिकारी एम. पी. सय्यद आदी उपस्थित होते.

बैठकीत निकम म्हणाले, तालुक्‍यातील पालखी वास्तव्य कालावधीत सुरक्षेत कुठल्याही प्रकारचा गाफीलपणा न करता चोख बंदोबस्त ठेवावा. पालखी सोहळा मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करावे. त्याबाबत ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना अवगत करावे. अधिकाऱ्यांनी आपत्कालिन परिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी समन्वय ठेवणे गरजेचे असून यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. वारीच्या कालावधीत स्वच्छता राहील आणि वारकऱ्यांना पाण्याची उपलब्धता राहील याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे.

पालखींचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी वीज पुरवठा अखंडीत राहावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पालखीच्या मार्गावरील अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढून टाकावीत. यंदा पालखी आगमनाच्या काळात पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे अंतर्गत रस्तांवर मुरूम टाकून चिखल होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही निकम यांनी यावेळी दिल्या.

तहसीलदार हनुमंत पाटील यांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पालखी काळात अधिकाऱ्यांना सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तालुक्‍यात प्रत्येक विभागाला, संस्थेला वृक्षलागवडीचे उद्दष्टि दिले आहे. त्याचे आत्ताच नियोजन करुन जुलै महिन्याची वाट न पाहता खड्डे तयार करुन वेळेत लागवडीचे नियोजन करावे. बुधवारी (दि. 21) योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहाण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
 

पालखी काळात वाहतुकीत बदल

बारामती तालुक्‍यात संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शनिवारी (दि. 24) बारामती शहर वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे बारामती शहर पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले. शहर वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे; शनिवारी (दि. 24) पहाटे तीन पासून पाटस रस्त्याने येणारी वाहतूक ही रिंग रोडने खंडोबानगर रस्त्याने कसबा कारभारी चौक मार्ग बारामती ते इंदापूर रस्त्याने बाहेर जाईल. भिगवण, बारामती एम.आय. डी. सी. रस्त्याने येणारी वाहतूक रिंग रोडने जळोची माळावरची देवीचे रस्त्याने इंदापूर-बारामती रस्त्याने बाहेर जाईल. बारामती ते पाटस रस्त्याला जाणारी वाहतूक ही बारामती ते भिगवण रस्त्याने विमानतळ मार्ग उंडवडी-सुपे मार्गे पाटस रस्त्याकडे जाईल. बारामती ते इंदापूरकडे जाणारी वाहतूक ही गुनवडी, डोर्लेवाडी रस्त्याने वालचंदनगर रस्त्याने बाहेर जाईल. पालखी मुक्काम ठिकाण जवळ तीन हत्ती चौक व भिगवण चौक असून त्या रस्त्यावरील सर्व वाहतूक ही बंद करुन टि. सी. कॉलेज रस्त्याने बाहेर जाईल. बारामती शहरमध्ये कोणतेही मोठे वाहन जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तर सोमवारी (दि. 26) संत सोपानकाका महाराज पालखीचे वेळी बारामती ते नीरा रस्त्याने जाणारी वाहतूक मोरगांव रस्त्याने पुण्याकडे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)