पालक पाहून हरवलेल्यांच्या चेहऱ्यावर “मुस्कान’

file photo

नगर पोलिसांनी 14 अल्पवयीन मुलांना दिले आई-वडिलांच्या ताब्यात

शिर्डी येथील साई मंदिर परिसरात केली कारवाई

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिर्डी: बेपत्ता अल्पवयीन मुलांच्या शोधासाठी शासनाकडून ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. या ऑपरेशन अंतर्गत नगर पोलिसांनी हरवलेल्या तब्बल 14 अल्पवयीन मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले. आज विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

राज्यात सुरु असलेल्या मोहिमेस जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर पोलीस विभागास उत्कृष्ट कामगिरी केली असून शिर्डीत गुरुवारी मुस्कान पथकाने कारवाही करत तब्बल 14 मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मुस्कान पथकाच्या प्रमुख जयश्री काळे यांनी दिली.

दरम्यान, ज्या मुलांच्या डोक्‍यावरील आई-वडिलांचे छत्र हरपलेल आहे, तसेच शाळाबाह्य आहेत, अशा मुलांना हक्काचा निवारा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगर पोलिसांच्या मुस्कान पथकास शिर्डी परिसरातून 13 मुले व एक मुलगी आढळून आले. शिर्डी शहरात लहान मुले ही साईबाबांचे फोटो लॉकेट, हार, फूल विक्री करतात. त्यांना हे काम करण्यासाठी एखादा दुकानदार व पालक भाग पाडत असतात. त्यामुळे त्यांचे बालपण हरवून जात आहे. त्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नगर पोलीस गेल्या काही वर्षांपासून ऑपरेशन मुस्कानची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येत असते.

बेवारस हिंडणाऱ्या मुलांना हे पथक ताब्यात घेऊन त्यांची व पालकांची खातरजमा करतात. त्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठवले जाते. तिथे त्यांना निवारा व शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. त्या अंतर्गत गुरुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात मुस्कान पथकाने कारवाई केली. त्यात सुमारे 13 मुलांना व एक मुलीस ताब्यात घेण्यात आले. यातील काही मुले व्यसनाधीनतेकडे झुकलेली आहेत, तर काहींना विविध व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. पथकाने चौकशी करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले.

सदर मोहीम नगर जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबरदरम्यात राबविण्यात येत आहे. दरम्यान शनिशिंगणापूर येथून पाच मुले, नगर शहरातून चार मुले ताब्यात घेण्यात आली होती. ही मोहीम पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ कांबळे, महिला कर्मचारी सोनाली पवार, मोनाली घुटे यांनी ही कार्यवाही केली.

भीक मागण्यासाठी मुलांना केले जाते प्रवृत्त

शिर्डीत अल्पवयीन मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त केले जाते. साई मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणी भीक मागण्यासाठी या मुलांना उभे केले जाते. तसेच अल्पवयीन मुलींच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना देहविक्रय व्यवसायात आणले जाते. अशा मुलींचीही या मोहिमेंतर्गत सुटका केली जाते. अशा घटनेची माहिती मिळाल्यावर किंवा संशयास्पद घटना आढळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)