पालक, पाल्यांनी “रिऍलिटी’ ओळखावी!

   चर्चा

 जयेश राणे

बॉलीवूड, वाहिन्यांवरील रिऍलिटी शो आदींमुळे देशाच्या युवा पिढीत नैतिकता आणि नीतीमत्ता यांचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी पालक अन्‌ पाल्य या दोघांनाही कसोशीने झटण्याविना पर्याय नाही. डान्ससारख्या ‘रिऍलिटी शोज’चा बाजार बंद होऊन समाजात प्रतिदिन होणारे ‘वैचारिक प्रदूषण’ थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या प्रदूषणाने घुसमट होत असलेल्या संतप्त, जागृत जनतेने वैध मार्गाने तो बाजार बंद करण्यास सज्ज झाले पाहिजे !

-Ads-

टीव्ही म्हणजे घराघरातील छोटा पडदा आहे. या छोट्या पडद्यावर वाहिन्यांवरून (चॅनेल्स) विविध स्वरूपाचे कार्यक्रम दाखवण्यात येत असतात. प्रत्येक कार्यक्रमाचा वर्गही ठरलेला आहे. शाळेमध्ये जशी हुशार आणि ढ अशा दोनीही प्रकारचे विद्यार्थी असतात, तसेच याविषयीही म्हणता येईल. काही विचारवंत दर्शकांना डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी अशा वाहिन्यांवरील कार्यक्रम आवडतात, तर काही मंडळींना मनोरंजन करणारे कार्यक्रम आवडतात. यापैकी एक रिऍलिटी शो म्हणजे “डान्स शो’. या कार्यक्रमांना वाहिन्यांवर सध्या अक्षरश: उधाण आले आहे.

भारतीय नृत्य कलेशी या कार्यक्रमांचा काडीमात्रही संबंध नाही. तंग आणि तोकडे कपडे परिधान करून अश्‍लील हावभाव करणे, इकडून तिकडे फक्त उड्याच मारत रहाणे, रोबोट म्हणजे यंत्रमानवाप्रमाणे हालचाल करत नाच करणे, असे काही “बिनडोक’ पठडीतील प्रकार या कार्यक्रमांतून पहायला मिळतात. म्हणजेच अशा कार्यक्रमांना, बुद्धी असूनही त्याचा सदुपयोग न करणाऱ्यांची व्यर्थ उठाठेव, असे संबोधल्यास वावगे वाटू नये. ज्या गोष्टीला नृत्य म्हणता येणारच नाही, अशा कुठल्यातरी प्रकाराकडे समाज वळला आहे आणि त्यालाच अभिमानाने ‘डान्स’ संबोधले जात आहे. डान्स या गोष्टीविषयी समाजामध्ये असलेले वेड वाहिन्यांनी अचूक हेरत “डान्स कार्यक्रमां’चा घाट घालून समाजाला “डान्स वेडे’ करून टाकले आहे.

अशा कार्यक्रमांत आपल्या पाल्याने सहभागी व्हावे, यासाठी बरेच पालक पुष्कळ आग्रही असतात. या माध्यमातून पाल्यास चमकण्याची संधी मिळणार आहे, असा पालकांचा अपसमज असल्याने, ते पाल्यास डान्सच्या क्‍लासला धाडण्यासाठी घसघशीत शुल्कही मोजतात. पाल्याला काहीही करून वाहिनीवर आणण्यासाठी पालकांचा चालू असलेला आटापिटा, त्यांची फाजील महत्वाकांक्षा या गोष्टींना पालकांचा अयोग्य दृष्टीकोन कारणीभूत आहे. अशा दृष्टीकोनात पालट करण्याची इच्छाशक्तीच नसल्याने अयोग्य विचारांच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांना पाल्यास योग्य दिशा दर्शन करता येत नाही.

वाहिन्यांवर चालू असलेले हे कार्यक्रम म्हणजे विदेशांतील डान्स कार्यक्रमांची नक्कल (कॉपी) आहे. भरतनाट्यम, कथ्थक,कुचीपुडी, ओडिसी, मणीपुरी अशा विविध स्वरूपाच्या भारतीय नृत्य कला सादर करणे हे येरागबाळ्याचे काम नाही, त्यासाठी बुद्धीचा योग्य उपयोग करावा लागतो. हे नृत्यप्रकार ईश्‍वर भक्तीशी निगडित आहेत. हे नृत्याविष्कार सादर करणारे कलाकार या कलेकडे ईश्‍वराची पूजा म्हणूनच पहातात आणि तसाच त्यांचा भावही असतो. त्यामुळे अशा कलांशी निगडित नृत्य पहातांना शांत, प्रसन्न वाटते. समाजातील काही मंडळी ही नृत्य शिकण्यासाठी तन, मन झोकून देतात.आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो तेव्हा त्याचा उपयोग कुठे ना कुठे होत असतो.

पण ज्या गोष्टीला ना ताल ना सूर अशा प्रकारे सर्वच बेताल असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा नव्हे काय? देशाची लोकसंख्या सुमारे 130 कोटींच्या आसपास आहे. आपण संख्येने बहुसंख्य आहोत. पण आपला देश, संस्कृती, येथील विविध कला या आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यात आपण अल्पसंख्यच आहोत. त्यामुळे भारताकडे जगाच्या व्यासपीठावर मांडता येतील, अशा पुष्कळ गोष्टी असूनही, आपण मात्र देशाबाहेरील गोष्टींना घट्ट पकडून बसलो आहोत; आणि त्याप्रमाणेच मार्गक्रमण करत रहाणार असा चंगच बांधला आहे. देशाबाहेरील कला आपण येथे सादर करतो; मात्र आपल्या कलेविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असतो, असे का? येथील कला शिकून त्याचा प्रसार केल्यास बहुतांश मंडळींना त्याची माहिती होऊन ती शिकण्याविषयी उत्सुकता निर्माण होण्यास साहाय्य होईल. मात्र देशाबाहेरील ‘डान्स’च्या प्रकारांचे मार्केटिंग जोरात चालू असण्यासारखे दुर्दैव ते काय ?

रिऍलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना घेऊन नियोजित स्टुडिओ बाहेर गर्दीत दिवसभर ताटकळत असतात. या पालकांना विचारावेसे वाटते की, आपल्या पाल्याला ज्या मार्गावर चालण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत तो मार्ग भविष्यात कुठे जातो याची आपल्याला कल्पना आहे का? पैशांची गुंतवणूक करायची असल्यास त्यासाठी बहुतांशजण कसून चौकशी करतात आणि मगच गुंतवणूक करतात. ज्यांना झटपट श्रीमंत होण्याची घाई असते ते तोंडावर आपटल्याने (फसवणूक झाल्याने) ‘तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे’, अशी त्यांची स्थिती होते. अशांमुळेच फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे फावते. तोच मुद्दा पाल्यांच्या भविष्याविषयी लागू करून चौकसपणे विचार केला असता चंदेरी क्षेत्रातील “पेज थ्री’ दुनियेची व्यवस्थित ओळख होईल. कोणत्याही पालकास आपल्या पाल्याने चुकीच्या मार्गावर जावे असे नक्कीच वाटणार नाही. पण गेल्या काही वर्षांपासून जो मार्ग पालकच आपल्या पाल्यांना दाखवत आहेत, त्यावरील काटे पाल्याचे शारीरिक, मानसिक शोषण करणारे आहेत.

कास्टिंग काऊच हा शब्द मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांसाठी ऐकण्यात नवीन नाही. या माध्यमातून सर्वाधिक लैंगिक शोषण हे स्त्री कलाकारांचे होत असते. तरीही काही स्त्री कलाकार पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी या अश्‍लाघ्य मार्गावर चालण्यास तयार असतात. पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी अश्‍लाघ्य मार्गावर चालण्याचा निर्णय घेणे म्हणजे उघडपणे वाममार्ग पत्करणे होय. हा मार्ग स्वीकारलेल्यांना कलाकार कसे म्हणता येईल? समाजाला अंधारात ठेवून पडद्यावर सोज्वळ भूमिका करणारे काही कलावंत समाजाची फसवणूकच करत असतात. दूरचित्रवाहिनी क्षेत्रात भरघोस क्रांती झाली डीडी-1 आणि डीडी-2 या वाहिन्या जाऊन अनेक खासगी वाहिन्या आल्या आणि खऱ्या अर्थाने “वैचारिक प्रदूषण’ चालू झाले.

आता तर स्मार्ट फोनमुळे भलताच स्मार्टपणा आल्याने पाल्य, पालक हातातील तो फोन जराही नजरेआड करण्यास तयार नाहीत. साधी रहाणी उच्च विचारसरणी याविषयी देशातील आदर्श व्यक्तिमत्वांची उदाहरणे द्यावी तेवढी थोडीच आहेत. दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद आदी मंडळींनी आपल्यातील कर्तृत्वाने जगावर छाप उमटवली. म्हणूनच आजही त्यांची नावे अत्यंत सन्मानाने घेतली जातात आणि ती घेताना निश्‍चितच अभिमान वाटतो, असे कर्तृत्व असले पाहिजे. ते काही एकाएकी निर्माण होत नसते. त्यासाठी बालपणापासूनच सुसंस्कारांचे बीज पाल्यात रोवले पाहिजे, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)