पालकांची दिशाभूल करणाऱ्या घोषणा नको

शुल्क पालकांनी ठरविण्याबाबत नुसत्याच घोषणा: शिक्षण क्षेत्रातून संताप
पुणे – खासगी शाळांच्या शुल्कवाढीविरोधात पालकांना अधिकार देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होणार का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. सरकारने फक्त आश्वासने आणि घोषणा करून पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक करू नये, असा संतापजनक आरोप शिक्षण क्षेत्रातून व्यक्‍त होत आहे.
खासगी शाळांच्या भरमसाठ शुल्कवाढीच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नेमलेल्या पळशीकर समितीचा अहवाल शासनाने स्विकारला आहे. यापुढे शिक्षक-पालक संघाबरोबरच 25 टक्के पालकांना याविरोधात आव्हान देता येणार आहे. शासनाचा हा निर्णय वरकरणी योग्य असला तरी शाळांच्या मुजोरीपुढे पालकांचे काही चालणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही न जुमानणाऱ्या या शाळा पालकांच्या विरोधाला कितपत किंमत देतील, याबद्दल साशंकता आहे. यासंदर्भात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याबाबत बोलताना आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत म्हणाले, आज महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय पालकांच्या पगारातील जवळपास 50-60 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च होते. तर दुसरीकडे खासगी शाळा मनमानी करीत फी वाढ करीत आहेत. विविध उपक्रम, खेळ प्रशिक्षण, वार्षिक फी इत्यादी नावाने अतिरिक्त फी गोळा करतात. आपल्या सोयीच्या शिक्षक पालक समित्या स्थापन करून तर कधी पालक शिक्षण समित्यांना न जुमानता, विश्वासात न घेता फी वाढ करतात. या संदर्भात मागील वर्षभर आंदोलने होत होती. पळशीकर समितीने नोव्हेंबर मध्ये अहवाल देऊनही अजून शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही. इतक्‍या उशिराने का होईना तावडे यांनी विधानसभेत जे आश्वासन दिले, त्याचे स्वागत करायला हवे. 25% पालकांच्या तक्रारीवर दखल घेतली जाणार हे योग्य आहे. पुढील वर्षासाठी शाळानी आत्ताच पालकांकडे फी मागणी सुरु केली आहे. त्यामुळे हा अध्यादेश तातडीने काढण्याची गरज आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुसत्या घोषणा न देता घेतलेल्या निर्णयाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करावी. कित्येक खाजगी शाळांमध्ये पीटीए स्थापन केलेले नाहीत. तर बहुतांश शाळांमध्ये पीटीएचे काम योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे पालकांना अधिकार मिळाले तरी शाळांची मुजोरी थांबणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)