पालकमंत्र्यांना महापौरांचा घरचा आहेर

  • महामार्गांवरील दारूची दुकाने सुरू करण्यावरून पुन्हा वादाची ठिणगी
  • न्यायालयाच्या निर्णयास प्राधान्य द्या; महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महामार्गावरील दारूची दुकाने बंद झाल्याने राज्य शासनास मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे सांगत पुणे शहरातील ही दुकाने सुरू करण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेल्याचे पालकमंत्री गिरिश बापट जाहीरपणे सांगतात. दुसरीकडे महापौर मुक्ता टिळक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून न्यायालयाच्या निर्णयास प्राधान्य द्यावे, अशी लेखी मागणी केली आहे. महापौरांच्या या पत्रामुळे पालकमंत्री बापट आणि महापौरांमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. महापौरांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची कोंडी झाली असून ते काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साद देत पुणेकरांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपला एक हाती सत्ता दिली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीतही अभूतपूर्व यश मिळवित भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. मात्र, सत्ता स्थापनेस अवघा दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच भाजपमध्ये राजकीय कुरघोडींना सुरूवात झाली आहे.
कचरा बंद आंदोलनापासून याची सुरूवात झाली. ग्रामस्थांनी 15 मे पासून उरूळी देवाची कचरा डेपोवर कचरा येऊ देण्यास मनाई केल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस महापौर मुक्ता टिळक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या पातळीवर हे आंदोलन मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याबाबतची कोणतीही कल्पना पालकमंत्री बापट यांना देण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या बापट यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली.
पुढील आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची राज्यस्तरीय बैठक होती. यावेळी महापौर टिळक यांनी ग्रामस्थ ऐकण्याच्या तयारीत नसल्याने या प्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी पालकमंत्री बापट यांना सोबत घेऊनच ही समस्या सोडवा, असे आदेश महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे बापट यांना टाळले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून समोर आले. त्यानंतर पुढील तीन दिवस या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची एकत्र बैठक घेतली नाही. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी महापौर परदेश दौऱ्यावर गेल्या तर बापटही तीन दिवसांनी कचरा प्रश्‍न तसाच ठेऊन परदेश दौऱ्यावर गेले. त्यानंतरही या दोघांमध्ये शितयुध्द सुरू असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्र्यांची कोंडी
अवघ्या तीन ते चार दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरिष बापट यांनी महापौर बंगल्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महामार्गा लगत दारू विक्री करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना महापालिका शहरातील महामार्ग ताब्यात घेण्यास तयार असून हे रस्ते अवर्गीकृत करण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास दिले असल्याचे सांगत त्याची प्रत पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच शासनाचा महसूल वाचविण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, महापौर मुक्‍ता टिळक यांनी गुरूवारी राज्य शासनास पाठविलेल्या पत्रामुळे पालकमंत्री बापट यांची चांगलीच कोंडी झाली आहे. या पत्रानुसार, सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या परिसरात 500 मीटर अंतरापर्यंत दारू बंदीचा निर्णय दिला आहे. महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेसोबत पत्र व्यवहार केला आहे. परंतू आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकाने आणि बारला परवानगी देण्यास थेट विरोध दर्शवित पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)