पालकमंत्री शिंदे सत्तेमुळे बनले मुजोर

डॉ. नवले यांचा आरोप; अकोले बंद शांततेत

अकोले – अकोले तालुक्‍यात आज बंद पुकारला आहे. तालुक्‍यातील पाणी जायकवाडीला पळवले जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमनेरला येतात; मात्र सामाजिकदृष्ट्या पेटलेल्या अकोल्यात यायला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही. ते सत्तेमुळे मुजोर बनले आहेत, अशी टीका माकप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला. दरम्यान, आज अकोले तालुका बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा अकोले तालुका पाणी बचाव समितीने सायंकाळी पत्रकारांशी बोलताना केला.
आज सकाळी तहसीलदार कार्यालयात आ.वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार मुकेश कांबळे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. तेव्हा सर्वच नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आमचा मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध नाही; पण राजकीय बदला म्हणून जर अकोले तालुका दुष्काळी घोषित होणार नसेल, तर अकोले तालुक्‍यातील जनता गप्प बसणार नाही, असा इशारा डॉ. नवले व इतरांनी दिला. आ.पिचड यांनी, “निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यालाच आमचा विरोध आहे. पहिल्यांदा तालुका दुष्काळी जाहीर करा. मगच पाणी न्या.अन्यथा, कायदा व सुव्यवस्था बिघडेल,’ असा इशारा दिला.
डॉ. नवले म्हणाले, “”पाणी, धरणे, प्रकल्पग्रस्त अकोले तालुक्‍यात आणि पाण्याचा वापर करणारे दुष्काळी यादीत. अकोले तालुक्‍यातील मंडले दुष्काळी असूनही अकोले तालुका दुष्काळी नाही.असा प्रकार सहन केला जाणार नाही. प्रशासनाचा दंडुक्‍यावर, ताकदीवर, पोलिसांवर विश्वास असेल, तर आम्हीही मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही. मामलेदार जाळणाऱ्या तालुक्‍याच्या नंतरच्या पिढ्या वांझोट्या जन्माला आलेल्या नाहीत.”
देशमुख यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. त्यावर सीताराम गायकर, मधुकर नवले, मीनानाथ पांडे,गिरजाजी जाधव, कैलासराव वाकचौरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भंडारदरा धरणाच्या पाणलोटात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला सरकार शंभर वर्षे न्याय देवू शकले नाही, असे निदर्शनास आणले. निळवंडेचे व भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीला नेण्यापूर्वी अकोले तालुका दुष्काळी जाहीर करा. अन्यथा, विपरीत परिणाम होतील, असा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग,शिवसेनेचे महेश नवले, “अगस्ती’चे संचालक गुलाबराव शेवाळे, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे,सुधाकर देशमुख, बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, कॉंग्रेसचे दादापाटील वाकचौरे, विलास आरोटे,उत्कर्षा रुपवते, राष्ट्रसेवा दलाचे विनय सावंत, शेतकरी संघटनेचे अशोकराव आरोटे व खंडू वाकचौरे आदींनी विविध मुद्धे मांडून अधिकारी वर्गाला धारेवर धरले.
जलसंपदाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. आरोटे, शाखाधिकारी अरुण खुळे, एच. यू. देशमुख,रा. ह. बोरसे, अभिजीत देशमुख आदी अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोंडण्याचा इशारा

भाकपचे कारभारी उगले, शांताराम वाळुंज, प्रा.विलास नवले यांनी तहसीलदार, कार्यकारी अभियंता व पोलीस निरीक्षकांना कार्यालयात कोंडण्याचा पवित्रा जाहीर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)