पालकमंत्री ओपनर घेऊन धावले

दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ही दारूची दुकाने सुरू करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला असून गुरूवारी महापालिकेत टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन आंदोलन केले.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या छायाचित्राला दारूच्या रिकाम्या बाटलाचा हार घालण्यात आला होता. “कचऱ्याचा प्रश्न महिनाभर टांगणीवर, माल दिसताच दारु-बाटली ऐरणीवर’, “रस्ते भकास, दारू बाटलीचा विकास’, “दारूला बुच बसले, पालकमंत्री ओपनर घेऊन धावले’, “दारूचा ठेवण्यासाठी मान, मुख्यमंत्री करणार का सुप्रीम कोर्टाचा अवमान’ अशी घोषणाबाजी केली.
या आंदोलनात शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, माजी गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे, नाना भानगिरे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, महिला आघाडीच्या राधिका हरिश्‍चंद्रे, मकरंद पेठकर, संजय वाल्हेकर, राजेश परदेशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महामार्गावर पाचशे मीटर परिसरामध्ये दारूविक्री आणि बार यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरांमधून जाणाऱ्या सर्व महामार्गांवरील दुकाने बंद करण्यात आली आहेत; तसेच बारला कुलूप लागले आहे. पुणे शहरामधून प्रामुख्याने चार महामार्ग जातात. यामध्ये पुणे-मुंबई हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यामुळे याच्या देखभाल दुरूस्तीचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुण्यात दारूची दुकाने सुरू करण्याला शिवसेनेने महापालिकेत आंदोलन करून विरोध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)