पार्थ अजित पवार आता राजकीय मैदानात

पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना हजेरी 
पिंपरी- महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक असलेल्या पवार कुटुंबियांची तिसरी पिढी आता राजकीय मैदानात उतरली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थिती वाढवली असून, मावळ लोकसभा मतदार संघाच्या आखाड्यात पार्थ यांना उतरण्यात येईल, अशी राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे.
सांगवी येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शनिवारी रोजगार मेळावा घेतला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार हेदेखील उपस्थित होते. एकाच व्यासपीठावर दोघेही उपस्थित असल्याने पार्थ पवारांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी तर नाही ना, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली.
अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यावर अजित पवार यांनी अनेकदा बोलण्यास टाळले होते. पण, शनिवारी अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार हे देखील व्यासपीठावर आले आणि सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले असून त्यावर पार्थ पवार यांचे फोटो झळकत आहेत. त्यामुळे पार्थ पवार आता प्रत्यक्षात राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी
मावळ लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेना खासदार श्रीरंग बारणे प्रतिनिधीत्व करतात. रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ आणि पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी सुरू झाली आहे. वास्तविक, या मतदार संघात कर्जत, उरण आणि पनवेल परिसरात शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठी आहे. तसेच, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभेतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे चांगले संघटन आहे. मात्र, पक्षांतर्गत मतभेदामुळे या जागेवर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, यावेळी पार्थ यांना उमेदवारी दिल्यास पक्षांतर्गत कुरबुरी कमी होतील, तसेच पवार कुटुंबियातील उमेदवार म्हणून अन्य पक्षातूनही राष्ट्रवादीला धुपी मदत होण्याची शक्यता आहे. परिणामी, मावळमधून लोकसभेसाठी तीव्र इच्छुक असलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)