पुणे : पार्किंग धोरणाविरोधात विरोधी पक्ष, संघटनांचा एल्गार

 महापालिकेबाहेर आणि भवनातही तीव्र आंदोलन, घोषणाबाजी

पुणे- महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेल्या पार्किंग धोरणाला विरोध करत विरोधी पक्ष आणि संघटनांनी एक होऊन महापालिका भवनाबाहेर आणि भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाही दिल्या.

मंगळवारी स्थायी समितीने पार्किंग धोरणाला मंजुरी दिली. त्यानंतर त्याचे पडसाद राजकीय विरोधकांमध्ये उमटले. स्थायी समितीमध्येही या धोरणाचा प्रस्ताव अचानक आणला गेला आणि तो बहुमताच्या जोरावर मंजूरही केला गेला. हा प्रस्ताव शुक्रवारी मुख्यसभेपुढे मंजुरीला येणार असल्याने विविध संघटनांनी दुपारी दोन-अडीच वाजल्यापासूनच महापालिका मुख्यभवनाबाहेर आंदोलनाला सुरूवात केली.

संभाजी ब्रिगेड, पतित पावन संघटना, भीम छावा, भीम आर्मी या संघटनांनी महापालिका भवनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बैल गाडी आणली तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोड्याची बग्गी महापालिका भवनाबाहेर आणली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना भवनाच्या आवारात येण्याला मज्जाव करत गेट लावून घेतले.

मुख्यसभेचे कामकाज सुरू होण्याआधी मनसेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. सभा सुरू झाल्यानंतर सभागृहात शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ घोषणा देण्याला सुरूवात केली. काळे पोषख आणि काळ्या टोप्या घालून शिवसेना सदस्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

या घोषणाबाजीत मनसे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबरही सहभागी झाले. या दोघांनी डोक्‍यावर खेळण्यातील कार, बाईक आणि टॅंकर यांची प्रतिकृती लावली होती. त्यानंतर त्यांनी त्या प्रतिकृती महापौर मुक्ता टिळक यांना भेट दिल्या. आयुक्त कुणाल कुमार यांनाही यातील एक खेळणे भेट देण्यात आले.

महापौरांसह नगरसेवकांना फटका; बाहेरच ताटकळावे लागले
आंदोलनामुळे महापालिकेचे सर्वच प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. आंदोलनकर्ते कोणत्याही मार्गाने आत प्रवेश करू नयेत यासाठी प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही आत जाण्याला मज्जाव करण्यात आला. याचा फटका महापौरांसह अन्य सदस्यांनाही बसला. महापौर गेटमध्ये दाखल झाल्याने आंदोलकांनी अधिकच जोरात घोषणाबाजीला सुरूवात केली. सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. प्रवेशद्वाराचे कुलुप तातडीने उघडून त्यांचे वाहन भवनाच्या आवारात सोडण्यात आले. या सर्व प्रकारामुळे महापौर सभागृहात सुमारे सात-आठ मिनिट उशीरा पोहोचल्या. माजी महापौर प्रशांत जगताप, मंजुषा नागपुरे आणि अन्य सदस्यांनाही काही काळ प्रवेशद्वारावर ताटकळत उभे रहावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)