पार्किंग खुले होण्यास मिळेना मुहूर्त

कौटुंबिक न्यायालयातील स्थिती : पे अॅन्ड पार्क दिवाळीनंतर सुरू होणार?

पुणे : पे अॅन्ड पार्कचा निर्णय झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील दोन मजली वाहनतळ 1 नोव्हेंबरपासून खुले करण्यात येणार होते. मात्र, अद्यापही पार्किंग खुले झाले नसून आता ते दिवाळीनंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

गाड्या लावण्याची सुविधा मोफत पुरवायची की, त्यासाठी पैसे आकारायचे या मुद्यावरून येथील पार्किंग तब्बल 14 महिन्यांपासून बंद होते. त्यावर या महिन्याच्या सुरुवातीला पे अॅन्ड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी पार्किंग 1 नोव्हेंबरपासून खुले होईल, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात ते सुरू झालेले नाही. पार्किंगबाबतचे पत्र उच्च न्यायालयाने दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनला (पीएफसीएलए) पाठविले आहे. त्यानुसार पे अॅन्ड पार्किंग तत्त्वावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे पार्किंग वापरता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून पार्किंगचे दर निश्‍चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएफसीएलएकडून देण्यात आली होती.

पार्कच्या मुद्यावर पीएफसीएलए आणि दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन (एफसीएलए) या दोन्ही संघटनांतील मतभेद उफाळून आले होते. एफसीएलएकडून न्यायालयात पे अॅन्ड पार्क सुरू करण्याच्या हालचालींना जोर आल्याने दुसरी संघटना आक्रमक झाली होती. पार्किंगसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यास आंदोलन पुकारून कामावर बहिष्कार घालू असा इशारा एफसीएलएकडून देण्यात आला होता.

आमची भूमिका कायम
पे अॅन्ड पार्कचा निर्णय मागे न घेतल्यास सर्व वकील पैसे न देता वाहने पार्क करणार आहेत, असा इशारा एफसीएलएने दिला होता. तर या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) जिल्हास्तरीय सह्यांची मोहीम राबविण्यात आली असून त्याचे निवेदन उच्च न्यायालयाला देण्यात आले आहे. पैसे घेण्यास सुरुवात केली तर आमची भूमिका कायम राहणार आहे. मात्र, याबाबत उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर निर्णय होणे बाकी आहे, अशी माहिती एफसीएलएचे अध्यक्ष अॅड. नियंता शहा यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)