पारिजातकाची फुले…

अनुराधा पवार 
“काय ग बाई, 2017 साल कसे बोलता बोलता संपून गेले. उद्या 2018 वर्ष सुरू होईल. 2017 कधी संपले ते समजले पण नाही.”” माझी बहीण वंदना सांगत होती. “‘हो ना,” मी म्हटले, “‘ खरंच आहे. एखादे वर्ष कधी संपले ते कळतही नाही. एखादे का? प्रत्येक वर्षाला आपण असेच म्हणत असतो. कधी प्रत्यक्ष बोलून दाखवतो, तर कधी शब्दात प्रकट करत नाही एवढेच. काळ निर्विकारपणे पुढे जात असतो, आपणच त्याला आपल्या भावभावनांच्या झालरी लावून सजवत असतो. आणि बरे-वाईट ठरवत असतो. कधी त्या झालरीं विस्कटूनही जातात. चालायचेच!” मी म्हटले, “”आणि सन 2017 कधी संपले ते न समाजायला आणखी एक खास कारणही आहे, 17 वे वर्ष म्हणजे बालपण संपल्याची जाणीव देणारे वर्ष. आपले बालपण कसे फुलपाखरू नाचत बागडत उडून जावे तसेच उडून गेले. तसेच हे 2017 साल संपून गेले. आता एकविसावे शतक अठराव्या वर्षात पदार्पण करील. त्याचे त्याचे स्वागत करायचे.” मी म्हटले. वंदनाने माझ्याकडे रोखून पाहिले. हसली, आणि म्हणाली, तुला कसे ग सुचते असे बोलायला? किती बरे वाटले ऐकून, की वर्ष एखाद्या फुलपाखरासारखे नाचत-बागडत उडून गेले.

माझी बहीण एमकॉम आहे. तिचा बराच वेळ तिच्या ऑफिसात हिशोबातच जातो. गप्पागोष्टी, हास्यविनोद, गाणीबजावणी असल्या गोष्टींसाठी तिच्याकडे वेळच नसतो. डेबिट, क्रेडिट, एंट्री, बॅलन्स, ट्रायल बॅलन्स ऑडिट….असल्या आमच्या दृष्टीने रटाळ गोष्टी तिच्या डोक्‍यात ठाण मांडून बसलेल्या असतात. खरं तर तिच्यात रसिकता आहे, पण ती दबली गेलेली आहे. अगदी लहानपणापासूनच. आणि ती सवय काही बदलत नाही. कधी ती प्रयत्न करते, पण मन वढाळ वढाळ म्हणतात, तसे ते पुन्हा हिशोबी बनते. तिच्याकडे चांगला भारी मोबाईल आहे. पण कोणाशी बोलायला, चॅटिंग करायला, मेसेज पाठवायला वेळ नसते. ऑफिसला जाताना गाडीत मात्र ती तिच्या मावशीला नित्य नियमाने फोन करते. अगदी ऑफिसला पोहचेपर्यंत गपागोष्टी करते. पण ऑफिसच्या दारात पोहचली की तिच्यातला अकाऊंटंट जागा होतो. आणि ती पुन्हा गंभीर होते.

त्याच्या उलट माझे आहे, माझे आयुष्य मला आठवते तेव्हापासूनच असे फुलपाखरासारखेच गेले आहे. घरात मी सर्वांची लाडकी होते. तशी सर्वात लहान नव्हते आणि सर्वात मोठीही नव्हते. सहा भावंडांमध्ये माझा नंबर चौथा होता. पण सर्वांची माया मात्र अगदी भरभरून माझ्या वाट्याला आली. अगदी ओंजळीत मावणार नाहे एवढी. आणि मीही तिचा आनंद अगदी भरभरून घेतला. माझ्या वडिलांनी मला काही चांगल्या सवयी लावल्या. प्रत्येक गोष्टीचा अगदी भरभरून आनंद घ्यायला शिकवले. पेला अर्धा भरलेला आहे, हे पाहायला शिकवले. कोणत्याही परिस्थितीत तक्रार करून-रडगाणे गाऊन आपण आपल्यालाच त्रास करून घेतो. शेवटी जे काही आहे, ते आपले आपल्यालाच भोगावे लागते. जर ते चुकणार नसेल तर उगाच तक्रार करून त्याचा त्रास वाढवून का घ्यायचा? तेव्हा परिस्थिती याहून चांगली असू शकली असती, पण वाईटही असू शकली असती याचा विचार करून आहे त्यात समाधान मानणे केव्हाही चांगले. आणि अगदी लहानपणापासूनच त्यांची ही शिकवण-त्यांच्या बोलण्यावागण्यातून शिकलेली माझ्या अगदी अंगी मुरली आहे.

तसे माझ्या मागेही काही कमी त्रास नाहीत. प्रापंचिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक… सगळ्या प्रकारच्या अडचणी अधूनमधून भेटीला येतच असतात. पण त्यांचा मी तिटकारा करत नाही. तिटकारा करत बसले तर त्या गोचिडीसारख्या चिकटून बसतात. त्यापेक्षा त्यांना मनाच्या कोपऱ्यात कोठेतरी जागा द्यायची आणि राहा म्हणायचे सुखात! बाकीच्या भागात आनंदाची फुलझाडे लावत राहायची असे तत्त्व मी ठेवले आहे. कधी त्या फुलझाडात एखादा पारिजातही असतो,
बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी…

असे म्हणायला लावणारा. पण फुले शेजारी पडत असली तरी सुगंध तर आपल्या वाट्याला येतो याचा आनंद घ्यायचा. कदाचित दुसऱ्या कोणी लावलेल्या पारिजाताची फुले माझ्या दारात पडतील, अगदी सडाच पडेल माझ्या अंगणात; हे मला माहीत आहे.

कदाचित हे सारे येणाऱ्या वर्षातही होणार असेल. तेव्हा सरत्या वर्षाला समाधानाने निरोप देऊन येत्या वर्षाचे आनंदाने स्वागत करावे. बोलता बोलता हे वर्षही कसे निघून गेले ते कळायते नाही.आपण आपले माणिक वर्माचे गाणे ऐकायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)