पारवे, कबूतर तिपटीने वाढले

पिंपरी – पक्षी पर्यावरणासाठी पूरक मानले जातात; परंतु कबुतरांची संख्या संख्या वाढणे कधी-कधी मानवी आरोग्यास धोकादायक ठरते, असा निष्कर्ष कबुतरांवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी नोंदवला आहे.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाचा पक्षी अभ्यास गट गेले तीन वर्षे कबुतरांच्या किंवा पारव्यांच्या वाढत्या संख्येचा अभ्यास करीत आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील कबुतरांची वाढती संख्या नागरिकांच्या आरोग्यास धोक्‍यांची ठरणार आहे. इमारतीची मोकळी जागा, बाल्कनी, उंच इमारतीचे टेरेस, पाण्याच्या टाकींजवळील आडोसा, पॅराफिट भिंती, खिडक्‍यांवर, एसीच्या बॉक्‍सवर कबुतरांची वस्ती वाढत आहे. कबुतरांची वाढती संख्या वेळीच आवरणे आवश्‍यक आहे, अन्यथा भविष्यात शहराचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते.

काय म्हणतो अहवाल?
याबाबत समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल शेवाळे, अमृत महाजनी, विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, जयप्रकाश शिंदे, संदीप सकपाळ, मंगेश घाग, राम सुर्वे यांनी विशेष अभ्यास अहवाल नोंदवला आहे. त्यातील महत्त्वपूर्ण बाबी खालीलप्रमाणे- शहरातील सर्वच प्रमुख उपनगरांमध्ये उंच इमारती परिसरांमध्ये कबुतरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कबूतर प्रतिकूल वातावरणामध्ये कोणत्याही आडोशाच्या जागी, जिथे सूर्यप्रकाश पोहचतो अशा ठिकाणी अंडी देतात. अंडी दिल्यानंतर साधारण 25 दिवसांमध्ये कबूतर पूर्ण वाढ होऊन आकाशात झेप घेते. शहरातील बहुतेक भूतदया धारक अज्ञानापोटी दाणे टाकून त्यांच्या संख्येत वाढ करीत आहेत. त्यामुळे मुळातच ऐतखाऊ पक्षांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

कबूतर आरोग्यासाठी त्रासदायक
संस्थेच्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की, कबूतर उच्छादी पक्षी असून तो अनारोग्याचा वाहक आहे. सगळ्यात तापदायक असते ती कबुतरांची विष्ठा! या विष्टेमुळे टीबी सारख्या धोकादायक रोगाचा फैलाव होतो. कोणी जवळ गेल्यास कबुतराची चोच रक्‍तबंबाळ होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हातात धान्य घेऊन त्यांना भरवण्याचे साहस करू नये. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांत त्यांचे अंडी देण्याचे प्रमाण जास्त असते.

आजाराची संवाहक
कबुतरांचा मानवी जीवनाशी थेट संबंध असलेला इतिहास शेकडो वर्षांचा आहे. इराण आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये कबुतरांसाठी शेकडो वर्षांपूर्वी विशाल मनोरे उभारण्यात आले होते. परंतु हे मनोरे कबुतरांच्या सुरक्षेसाठी उभारले गेले नव्हते, तर त्यांची विष्ठा सर्वसामान्यांच्या संपर्कात येऊन रोगराई पसरू नये, यासाठी उभारले होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हजारो जणांचे प्राण वाचवण्याचे काम केलेली संदेश वाहक कबुतरे जरी संदेश पोहोचवण्यात तरबेज असली, तरी ती काही गंभीर आजारांची संवाहक आहेत. कबुतरांच्या पंखातून निघणाऱ्या फिदर डस्टमुळे अती संवेदनशील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्‍यता असते. धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किड्यांच्या विष्ठेपासून वेगवेगळ्या प्रकारच्या 200 हून अधिक प्रकारच्या अलर्जी होतात आणि याला प्रतिबंध घातला नाही, तर दमा बळावण्याची शक्‍यता वाढते. यासाठी शहरातील सर्व कबुतर खाने शहरातील नागरी वस्तींपासून दूर स्थलांतरित करायला हवेत, अशी मागणीही होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)