पारदर्शी राज्यकारभाराच्या मेरूमणी : अहिल्याबाई 

प्रा.शेखर हुलगे 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 293 वी जयंती आज दि. 31 रोजी देशभर साजरी होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा. 

भारताला उत्तुंग अशा कर्मयोगिनींची प्राचीन काळापासून प्रदीर्घ परंपरा आहे. सनातन काळातील गार्गी, मैत्रैयी, लोपामुद्रा ते मध्ययुगीन कालखंडातील रझिया सुलतान, संत मीराबाई, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर तसेच आधुनिक काळातील राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर या स्त्रीशक्तींनी इतिहासात आपल्या पाऊलखुणा उमटवल्या व जगास त्याची दखल घेणे भाग पाडले. मध्ययुगीन काळातील सर्वोत्तम शासकांपैकी एक तसेच पुण्यश्‍लोक ही दुर्मिळ उपाधी ज्यांना पारदर्शक राज्यकारभारासाठी बहाल करण्यात आली, त्या मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या (मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशचा भाग) शूर महाराणी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय इतिहासावर आपला ठसा उमटवलेला आहे.

अहिल्यादेवींचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्‍यातील चोंडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे. ते गावचे पाटील म्हणून कार्यरत होते. त्यांनी छोट्या अहिल्येला स्वतः शिक्षण दिले. अहिल्यादेवी या नम्र व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या काळात मराठा साम्राज्याचे सुभेदार माळवाधिपती मल्हारराव होळकर पुणे दौऱ्यासाठी चोंडी या गावी आले असताना, त्यांना आठ वर्षाच्या अहिल्या मंदिराच्या बाहेर गरीब व भुकेलेल्या लोकांना अन्नवाटप करीत असताना दिसल्या. ते दृष्य पाहून मल्हारराव अत्यंत प्रभावित झाले. त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांनी आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

इ. स. 1733 साली खंडेराव व अहिल्या यांचा विवाह संपन्न झाला. कालांतराने त्यांना पुत्र मालेराव व कन्या जनाबाई ही अपत्ये झाली. मात्र सन 1754 च्या कुंभेरच्या लढाईत त्यांचे पती खंडेराव धारातीर्थी पडल्याने अहिल्यादेवींवर वैधव्य कोसळले. त्यावेळी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता मल्हाररावांनी त्यांना धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी व शासन व्यवस्थेचे धडे दिले; परंतु संकटांची मालिका संपत नव्हती. सासरे मल्हारराव व पाठोपाठ पुत्र मालेराव यांचे निधन झाल्यावर अहिल्यादेवींनी प्रजेच्या हितार्थ 11 डिसेंबर 1767 रोजी राज्यकारभार स्वत:च्या हाती घेतला व पेशव्यांच्या अनुमतीने स्वतःचा राज्याभिषेक करविला. त्यावेळी महिला शासक म्हणून काही सनातन्यांचा विरोधही त्यांना पत्करावा लागला.

खरेतर, सासरे, पती व अपत्ये यांच्या मृत्यूने कोणतीही स्त्री हतबल झाली असती. मात्र मल्हाररावांच्या शिकवणीनुसार त्यांनी वैयक्‍तिक दुःख अव्हेरले व लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. पुढे होळकरांच्या सैन्याने नव्या राणीचे नेतृत्व मनापासून स्वीकारले. राज्यकारभार हाती घेतल्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यादेवींनी स्वतः हाती तलवार घेऊन आक्रमणकर्ते व लुटारूंपासून आपल्या राज्याचे संरक्षण करून निर्भीड वृत्तीचे दर्शन घडविले. कालांतराने त्यांनी तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचे दत्तक पुत्र) यांना सेनापती घोषित करून सैन्याचा कारभार त्यांच्याकडे सोपवला.

अहिल्यादेवींची राजकीय समज व दूरदृष्टी अतिशय प्रगल्भ होती हे त्यांनी 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. इंग्रजांना अस्वलाची उपमा देत, त्यांचा “भविष्यातील धोका’ असा उल्लेख त्यांनी या पत्रात केला होता. “वाघाची शिकार करण्यासाठी योजना व बळाचा वापर करता येतो. परंतु अस्वलाची शिकार करणे खूप अवघड आहे. त्याला फक्‍त चेहऱ्यावर तडाखा देऊनच मारता येते. जर तुम्ही त्याच्या शक्‍तिशाली बाहुत सापडला तर अस्वल तुम्हास ठार मारीलच, जसे की इंग्रज! त्यांचा मुकाबला करणे सहजसोपे नाही.’

अहिल्यादेवींनी मध्ययुगीन कालखंडात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देताना स्वत:ची मुलगी जनाबाई हिचा विवाह राज्याचे दरोडेखोरांपासून संरक्षण करणाऱ्या, दुसऱ्या जातीतील यशवंतराव फणसे या कर्तबगार युवकाशी लावून देत, जातीनिर्मूलनाचा आदर्श प्रजेपुढे ठेवला. त्या काळचा हा निर्णय अत्यंत धाडसी व कौतुकास्पदच म्हणावयास हवा. पुढे अहिल्यादेवींच्या 30 वर्षाच्या लोकप्रिय शासनकाळात त्यांनी आपल्या खाजगी खजिन्यातून शंभरहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पवित्र तीर्थक्षेत्रे काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीनारायण, रामेश्‍वर आणि जगन्नाथपुरी ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे. त्यांनी उत्तरेतील हिमालयापासून ते दक्षिण भारतापर्यंत यात्रेकरूंसाठी मंदिरे, घाट, तलाव, बारव (विहिरी), रस्ते, बागा, धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे व पाणपोया निर्माण केल्या ज्या आजही वापरल्या जातात.

कालांतराने त्यांनी आपली राजधानी नर्मदा नदीच्या किनारी महेश्‍वर येथे वसविली. राजधानी महेश्‍वर हे विविध कलागुणांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी, संस्कृत विद्वान खुशाली राम यांना सन्मान व आश्रय दिला. तसेच प्रजेसाठी वस्त्रोद्योग व्यवसाय निर्माण करून दिला, जो आजही विख्यात आहे. आपल्या तीन दशकांच्या आदर्श कार्यकाळात अहिल्यादेवींनी कृषी विकास, जलसंधारण व शेतकरी कल्याणच्या अनेक योजना राबवून शेतकऱ्यांना करमुक्‍त केले. फक्त श्रीमंत व व्यापारी यांच्याकडून कर आकारले. इंदूरसारख्या अनेक छोट्या खेड्यांचे रूपांतर महानगरात केले. राज्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याचे तलाव व वने आरक्षित करून देवराई निर्माण केली. खासगी जीवनात अत्यंत दयाळू व क्षमाशील असलेल्या अहिल्यादेवी न्याय देताना मात्र कठोर होऊन निःपक्षपातीपणे वागत. त्यामुळे केवळ भारतीयच नव्हे तर पाश्‍चिमात्य इतिहासकारांनीही अहिल्यादेवींच्या कार्याविषयी गौरवपूर्ण उद्‌गार काढले आहेत.

ब्रिटिश अधिकारी जॉन माल्कम म्हणतो की, “प्रजेने अहिल्याबाईंना संतत्व बहाल केले आहे. समकालीन सर्व स्त्री राज्यकर्त्यांपैकी त्या सर्वात अनुकरणीय आहेत.’ जॉन केय अहिल्यादेवींना “तत्वज्ञानाची राणी’ असे संबोधतो. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या “डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात नमूद करतात की, “अहिल्यादेवींचे राज्य मध्य भारतात इंदूरनजीक तीस वर्षे चालले. त्यांच्या राज्यात प्रजा परमवैभवात होती. इतरांसाठी एवढे उत्कृष्ट शासन व परिपूर्ण व्यवस्था केवळ कल्पित गोष्टच होती. म्हणून लोक त्यांच्या मृत्यूपश्‍चातही त्यांचा उल्लेख नेहमी “संत’ असाच करतात.

मराठा साम्राज्याची पताका डौलाने फडकत ठेवणाऱ्या व आदर्श राज्यकारभारामुळे सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे महेश्‍वर येथे 13 ऑगस्ट 1795 मध्ये निधन झाले. अशा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या कार्याच्या सन्मानार्थ भारत सरकारने 1975 व 1996 साली त्यांचे नाव व प्रतिमा असलेले टपाल तिकीट जारी करून त्यांना समस्त भारतीयांकडून मानवंदना दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)