“पारदर्शी’ कारभाराला लाचखोरीची “किड’

पिंपरी – महापालिकेच्या पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयातील कर संकलन विभागातील कनिष्ठ लिपिक सोमवारी (दि. 26) “एसीबी’च्या जाळ्यात अडकला. फ्लॅटचे हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी दोन हजाराची लाच घेत असताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. महापालिकेतील सत्तांतरानंतर गेल्या वर्षभरात लाच प्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील “पारदर्शी’ कारभाराला लाचखोरीची “किड’ लागली का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

अमोल चंद्रकांत वाघिरे (वय-38, रा. धोंडिबा वाघिरे चाळ, पिंपरी गावठाण, पिंपरी, पुणे) असे “एसीबी’च्या जाळ्यात सापडलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याबाबत 45 वर्षीय एका इसमाने तक्रार दिली. तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटचे पत्नीच्या नावाने हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी आरोपीने दोन हजार रुपये मागितले होते. याबाबत लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाने कारवाई केली असून कनिष्ठ लिपिकास दोन हजारांची लाच स्वीकारताना पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस एस घार्गे, डी. वाय. एस. पी. दत्तात्रय भापकर, पोलीस हवालदार खान, पोलीस नाईक विनोद झगडे यांनी केली.

दरम्यान, “भ्रष्टाचारमुक्‍त कारभार’ असा प्रचार करुन भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र, भाजपाच्या कार्यकाळात लाचखोरीच्या घटना सर्वाधिक चव्हाट्यावर आल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारी पाहिली असता 1997 पासून 2017 पर्यंत भाजपाच्या कार्यकाळात एकूण सहा कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपाच्या कार्यकाळात भ्रष्ट कर्मचाऱ्यांची “नाकेबंदी’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे, असेही भाजपा पदाधिकारी सांगताना दिसत आहेत.

भ्रष्टाचार मोडीत काढण्यास अपयश..?
दरम्यान, महापालिकेत अधिकारी-कर्मचारी “लक्ष्मी दर्शना’शिवाय काम करत नसल्याचे या प्रकरणावरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेत जागोजागी फलक लावून जनजागृतीही करण्यात येत आहे. यावर “एसीबी’ने लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार मोडीत काढण्यास अपयश येवू लागले आहे.

2018 मधील पहिली “शिकार’
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, 17 फेब्रुवारी 1997 पासून 1 ऑगस्ट 2017 पर्यंत एकूण 21 कर्मचाऱ्यांवर लाच प्रकरणी कारवाई केली आहे. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांची निर्दोष सुटकाही झाली आहे. महापालिकेतील सत्तांतरानंतर प्रभारी शिक्षणाधिकारी अलका कांबळे, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, लघुलेखक राजेंद्र शिर्के, सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, लेखाधिकारी किशोर शिंगे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आता 2018 मधील कनिष्ठ लिपिक अमोल वाघिरे याच्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे महापालिकेत 2018 मधील लाचखोरी प्रकरणातील ही पहिली “शिकार’ आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)