पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करा – मुख्यमंत्री

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा पुण्यापेक्षा अधिक वेगाने प्रगतीशिल होवू शकतो. याकरिता शहराच्या विविध विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांना राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. परंतु, जनतेने विश्‍वासाने दिलेला महापालिकेचा कारभार हा प्रत्येकाने पारदर्शक व लोकाभिमुख करण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात शनिवारी (दि.12) पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील विविध कामांचे ई उद्‌घाटन व भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, शिवाजी आढळराव-पाटील, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, सचिन पटवर्धन, पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलेजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे आझम पानसरे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यासह राज्यातील नागरिकांची पिंपरी-चिंचवड शहराला पसंती आहे. शहरात नागरिकांचे वास्तव्य प्रचंड वाढू लागले आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी विविध पायाभूत योजना राबवून या भागाचा कायापालट करायला हवा. शहरातील वाहतुकीचे नियोजनासाठी मोठे-मोठे उड्‌डाणपूल, सांस्कृतिक नगरीसाठी सभागृहे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे यासह अन्य कामांचे योग्य नियोजनाने प्रकल्प राबविण्यात यावेत. यापूर्वीच पिंपरी-चिंचवड शहर प्रगतशिल आहे. मात्र, काहीकाळ महापालिकेच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब बनून विकास खुंटला होता. परंतु, शहरातील नागरिकांना निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, शहर रोल मॉडेल बनवून दाखवू, अशी ग्वाही दिली.

त्यानुसार पिंपरी-चिंचवडकर जनतेने आम्हाला पुर्ण बहूमताने सत्ता दिली. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी भाजपाने योग्य पाऊले उचलली आहेत. काही प्रथा, परंपरा बंद करुन कारभार सुधारला जात आहे. भ्रष्टाचार मुक्‍त कारभार करुन पारदर्शकता आणण्याची जबाबदारी दोन्ही आमदारांची आहे. तसेच, शहरात अधिकाधिक स्वच्छता हवी, कचऱ्यांवर शास्त्रोक्‍त पध्दतीने प्रक्रियाकरुन त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी, आणि शहरातील सर्व सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करुनच ते पाणी नद्यामध्ये सोडण्यात यावे. त्यामुळे शहरातील घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन केल्याशिवाय शहर अधिक चांगले होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)