पारदर्शक निवडणुकीसाठी आणखी परिनियमांची गरज

महाविद्यालय विद्यार्थी निवडणूक : अंमलबजावणींत अडथळे उद्‌भवणार

पुणे – राज्य शासनाने महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत परिनियम, आचारसंहिताही प्रसिद्ध केले. परिनियमाला अनुसरून विद्यार्थी निवडणुकांची महाविद्यालयात अंमलबजावणी करताना काही अडथळे उद्‌भवणार आहेत. ऐन निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन केलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र ठरवावे, काय कारवाई असावी, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यापीठाला आपल्या स्तरावर परिनियमाबरोबर काही उपनियम तयार करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-

नवीन विद्यापीठ कायदा 1 मार्च 2017 लागू झाला. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकीची तरतूद केली. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका होतील, अशीच शक्‍यता गृहीत धरून विद्यार्थी संघटनांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यानुसार तयारी सुरू केली होती. मात्र, त्याविषयीचे परिनियमच प्रसिद्ध न केल्याने यावर्षी महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकीचे बिगुल वाजू शकले नाही. आता मात्र निवडणुकीचे परिनियम प्रसिद्ध केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकांत विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी पात्रतेचे निकष निश्‍चित करण्यात आले आहे. विद्यार्थी एटीकेटीसह उत्तीर्ण झालेला नसावा, प्रवेश घेतल्यापासून सात वर्षांत उच्च शिक्षण पूर्ण केले पाहिजे, एक वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला नसावा, 25 वर्षे पूर्ण असावे, गैरप्रकार केलेला नसावा, ही सर्व पात्रतेचे निकष आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या कालावधीत गैरकृत्य केले असल्यास, तो विद्यार्थी अपात्र कसे ठरवावे, त्याचे काहीच परिनियमात स्पष्ट उल्लेख नाही. प्रत्यक्ष निवडणूक घेत असताना काही नव्याने नियम विद्यापीठाला तयार करावे लागतील. तरच निवडणुका पारदर्शक होण्याची चिन्हे आहेत.

विद्यार्थी निवडणुकांच्या काळात आचारसंहितेच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यास, त्या उमेदवारांवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाची कारवाई होईल. त्याचबरोबर त्याची उमेदवारी रद्द होईल. मात्र, त्यापूर्वी संबंधित उमेदवारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. त्यासाठी तक्रार निवारण यंत्रणेकडे दाद मागण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्ष निर्णय घेत असताना कशाच्या आधारावर उमदेवारी रद्द करायची, असे कोणतेच नियम निश्‍चित नाहीत. त्यामुळे विद्यापीठाला काटेकोटपणे निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी नवे परिनियम अथवा उपनियमाची गरज लागणार आहे.

विद्यार्थी निवडणुकांची आचारसंहिता
– उमेदवारांना पॅनेल तयार करता येणार नाही
– कोणत्याही पक्षाचे चिन्हांचा वापर करता येणार नाही
– कोणत्याही धर्माचा उल्लेख नसावा
– मिरवणूक काढण्यास अथवा मेळाव्यास नकार
– अनधिकृत व्यक्‍तीस मतदान केंद्रात मनाई

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)