पारदर्शकतेच्या चिखलात कमळ रूतून बसले – राधाकृष्ण विखे-पाटील 

पीक विमा कर्जातून खासगी कंपनीला 2200 कोटींचा फायदा

मुंबई – शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्जासंबंधीचे काम सरकारी ऍग्रिकल्चर इन्श्‍युरन्स कंपनीला न देता खासगी कंपन्यांकडे कोणी दिले, कोणाचे संबंध होते, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधानसभेत केला. यामध्ये एका खासगी कंपनीचा 2200 कोटी रुपयांचा लाभ झाला, असा आरोपही त्यांनी केला. सरकार आभासी विश्‍वातून बाहेर येत नाही, पारदर्शकतेच्या चिखलात कमळ रूतून बसले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

अंतिम आठवडा प्रस्ताव आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडला. यावर बोलताना त्यांनी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. राज्यातील बहुतांशी भागात पावसाअभावी दुष्काळी स्थितीचे धोका, दुबार पेरणीचे संकट याचा उल्लेख करतानाच समृद्धी महामार्गाला असलेल्या शेतकरी विरोधाकडेही विखे-पाटील यांनी लक्ष वेधले. दुष्काळी स्थिती निर्माण झाली की पीकविम्यापैकी 25 टक्‍के रक्कम त्वरित द्यायची असे निकष आहेत. याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, असा सवाल त्यांनी केला.

मराठवाड्यातून स्थलांतरे होत आहेत. दोन महामार्ग आधीच असताना समृद्धी महामार्गाची गरज काय? त्यामुळे नक्की कोणाची समृद्धी होणार आहे, असा टोला त्यांनी लगावला. मंत्र्यांवर आम्ही पुराव्यानिशी आरोप केले, तेव्हा क्‍लीन चिट देण्यात आली. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या संबंधांने पुरावे दिले तरी ते आजही आपल्या पदावर आहेत, याकडे लक्ष वेधतानाच त्या दोन्ही मंत्र्यांचे खुलासे विसंगत आहेत. गृहनिर्माण मंत्र्यांवर वरदहस्त कोणाचा किंवा कोणाच्या दबावामुळे ते पदावर आहेत, असा सवालही त्यांनी केला. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशीच्या कायद्यांतर्गत न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवरही त्यांनी टीका केली. शिवसेनेचा एफएम रेडिओ झाला आहे. विरोधी आवाज दडपण्याचे काम हे सरकार करत आहे. आपल्याच पक्षाचे सदस्य एकनाथ खडसे यांचाही आवाज दडपला जातो आहे, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठ निकालातील घोळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, कुलगुरूंनाच त्यामुळे घरी जावे लागले, असाही टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)