पारगाव येथे भरली मेंढरांची अनोखी जंगी स्पर्धा

सात फूट नारळाचे तोरणाला शिवणाऱ्या कळपाला बक्षीस

वडूज, दि. 10 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील पारगाव येथे मेंढरांची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत जिंकणाऱ्या कळपाला बक्षीसही देण्यात आले. या स्पर्धेची चर्चा मात्र तालुक्‍यात सुरू आहे. दिवाळीच्या पाडव्यानिमित्त धनगर समाज बांधवांच्या वतीने ही शर्यत आयोजित केली जाते. या शर्यतीत सात फूट उंचीवर बांधलेल्या नारळाच्या तोरणाला जे मेंढरु उडी मारून शिवेल त्या कळपाला बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे, नंदकुमार वाघमोडे, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत देवकर, रघुनाथ करे, विकास जानकर, दादा जानकर, उपसरपंच सुधीर पवार, माजी उपसरपंच विजय पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
बैलगाडी, बैलगाडा, श्वान शर्यतीच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या गावात मेंढराची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत परिसरातील अनेक मेंढपाळ सहभागी होत असतात. स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात.
यावर्षी धनगर समाजाच्या श्रीबिरुदेव धनगर समाज मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बिरोबा मंदिरासमोर सात फूट उंचीवर नारळाचे तोरण बांधले होते. अनेक कळपातील मेंढरांचे कळप या स्पर्धेत सहभागी झाले. सहभागी कळपातील मेंढरांची पाडव्यानिमित रंगरंगोटी करून आणले होते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर मेंढराचा कळप मंदिरास प्रदक्षिणा घालून बांधलेल्या तोरणाला ज्याचा स्पर्श होईल त्या कळपाला विजेते घोषित केले जात होते. यावर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षीस चांदीचे कडे, ढाल व मानाचा फेटा, द्वितीय क्रमांक चांदीची चैन, ढाल, मानाचा फेटा, तृतीय क्रमांक चांदीची अंगठी, ढाल व मानाचा फेटा अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती.
यावेळी एकनाथ ठोंबरे, ज्ञानेशवर जानकर, गुलाबराव जानकर, मारुती जानकर, दादा जानकर, शरद ठोबरे, साहेबराव जानकर,शंकर झंजे, सयाजी झोडगे, तात्याबा रोकडे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)