पारंपारिकतेला छेद…

 

डाळींब, द्राक्ष बागेतून तिघे भावंड मिळवितात लाखोंचे उत्पन्न

फारसे भांडवल हाताशी नसतानाही शेतीमधील पारंपारिकतेला छेद देत काही तरी वेगळे करायचे असा निश्‍चय तिघा भावंडांनी केला. त्यातूनच दोन एकरावर डाळींब बागेची लागवड केली. मशागतीतील नियोजन, स्वत: मेहनत घेऊन, पिकातील बारकावे शिकत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात लाखोंचे उत्पन्न मिळवून डाळींब लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. यातून मिळालेल्या आत्मविश्‍वासातून त्यांनी द्राक्ष, लिंबू बागही त्यांनी यशस्वीरित्या फुलविली. तरकारी, कांदा अशी पिके घेऊन बाजारभावाची “टांगती तलावर’ कायम डोक्‍यावार बाळगण्यापेक्षा हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळबागा कधीही फायद्याच्याच असल्याचे पोपट, संपत, दौलत कोथिंबिरे या तिघा भावंडांनी दाखवून दिले आहे. आता त्यांच्या या धाडसाने प्रेरित होऊन परिसरात तरुण शेतकरही फळबागांच्या प्रयोगाकडे वळत आहेत.

आम्हाला सात एकर क्षेत्र आहे. श्रीगोंदा शहरापासून काही अंतरावर राहत असल्याने सुरुवातीपासूनच तरकारी पिकांवर आमचा भर असायचा. यामध्ये विशेषत: वांगी, टोमॅटोवर भर राहायचा, असे सांगत दौलत कोथिंबिरे म्हणाले, आम्ही अधूनमधून पालेभाज्याही घ्यायचो. यामध्ये कधी परवडायचे तर कधी केलेला खर्चही निघत नसायचा. यामध्ये बऱ्याचदा नुकसानच व्हायचे. त्यामुळे एमए बीएड असलेला भाऊ पोपट याने डाळींब बागेची कल्पना मांडली. डाळींबावर खर्च खूप होतो. औषध फवारणीच बऱ्याचदा करावी लागते. बाजारभाव मिळेल का? खर्च वाया तर जाणार नाही ना, असे अनेक प्रश्‍न होते. याबाबत तिघा भावात चर्चा होऊन डाळींब लागवडीचा निणर्य पक्‍का केला. मग त्याविषयीची माहिती गोळा करायला सुरुवात केली. एखादा मार्गदर्शक घेऊनच सुरुवात करायची असे ठरले. भगवा जातीची पारगाव येथून 900 रोपे आणून दोन एकरात त्याची लागवड केली. 12 बाय 8 फुटावर रोपांची लागवड केली. दररोज झाडातील होणारे बदल आम्ही स्वत: पाहिले. त्याची मशागत, खते, औषध फवारणी याविषयीची कामे आम्ही स्वत: केली. त्यामुळे यातील बारकावे आम्हाला समजले.

18 महिन्यानंतर पहिला बार (फळ) धरला. सुरुवातीपासूनच बार धरताना 450 झाडांचे दोन टप्पे करायचे ठरवले. त्यामुळे बागेकडे लक्ष देणेही सहज शक्‍य झाले. फूलगळ, इतर रोग टाळता आले. त्याचा फायदा उत्पादन वाढ होण्यात झाला. फळ परिपक्‍व झाल्यानंतर ते बाजारात विकायचे की, जागेवरच व्यापाऱ्याला द्यायचे हा मुद्दा महत्त्वाचा होता. परंतु, सुरुवातीलाच अधिक “रिस्क’ (धोका) नको असा विचार करून जागेवरच व्यापाऱ्याला 38 रुपये किलो दराने डाळींब दिले. पहिल्याच टप्प्यात 10 टन डाळींब निघाले. पहिल्याच प्रयत्नात साडेचार लाख रुपये मिळाले. दीड लाखाच्या आसपास खर्च झाला होता. यातून पहिल्याच प्रयत्नात अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यामुळे डाळींबावरच लक्ष केंद्रीय करायचे असे ठरवल्याचे दौलत यांनी सांगितले. डाळींबाला किमान 40 रुपये, द्राक्षला किमान 35 रुपये किलो भाव मिळाला, तर तोटा होण्याचा प्रश्‍नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उन्हाळ्याचे तीन-चार महिने कठीण
तीन कुपनलिका (बोअर), एक विहीर, एक शेततळे ही फळबागेच्या पाण्याची व्यवस्था आहे. पावसाळा व त्यानंतरचे चार महिने पाण्याची फारसी अडचण येत नाही. उन्हाळ्याचे तीन-चार महिने मात्र कठीण जातात. तेव्हा पाणी अत्यंत नियोजनपूवर्क वापरावे लागते. आम्ही ठिबक केले असून त्याद्वारेच पाणी देतो. त्यामुळे पाण्याची बचत होते. मुबलक पाणी असताना ते वाफ्यातून देतो. मुळातच फळबागेला कमी पाणी लागते. त्याचाही फायदा येथे होतो. उन्हाळ्यात कायमस्वरुपी पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी 14 गुंठ्यावर शेततळे तयार केले आहे, असे पोपट कोथिंबिरे यांनी सांगितले.

द्राक्ष, लिंबातूनही लाखोंचे उत्पन्न
डाळींब बागेचा प्रयोग यशस्वी झाला. त्यातून समजले की फळबागांमधून अधिक प्रमाणात पैसे मिळतात. त्यानंतर आम्ही द्राक्ष आणि लिंबू बागेकडे वळायचे ठरविले. त्यानुसार अडीच एकरावर द्राक्ष बाग लावली. डाळींबाप्रमाणेच द्राक्ष बागेचाही आम्ही स्वत: अभ्यास केला, त्यातील बारकावे समजावून घेतले. त्यातूनही पहिल्या दोन वर्षातच तब्बल 40 टन द्राक्ष उत्पादन मिळविले. द्राक्षही जागेवरच व्यापाऱ्याला दिले. त्याला 35 रुपये किलोचा भाव मिळाला. यातूनही खर्च वजा जाता दोन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. त्यानंतर एक एकरावर लिंबू बागही लावली. त्यातूनही उन्हाळी बारातून चांगले पैसे मिळतात, असे संपत कोथिंबिरे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)