पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या अडचणीत

उत्पादन खर्च वाढला, विक्रीत घट झाल्याने विणकर चिंतेत

बिदाल, दि. 6 (वार्ताहर) – हातमागाच्या सहाय्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या पूर्णपणे धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. उत्पादनाचा वाढता खर्च, कमी होणारी विक्री आणि अल्प किंमत, बाजारपेठ न मिळणे या प्रमुख गोष्टी हा व्यवसाय धोक्‍यात येण्याची कारणे आहेत. याशिवाय घोंगडीचा वापर कमी झाल्यामुळे ग्राहकही घटले आहेत.
पूर्वी पावसात शेतीची कामे करताना ऊब मिळावी, म्हणून घोंगडीचा वापर केला जात होता. तसेच लग्न समारंभ, बैठका यासाठी प्रामुख्याने घोंगडीचाच वापर असायचा. घोंगड्याला कोकणामध्ये अधिक मागणी होती आणि अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे. पूर्वी घोंगडीबरोबर कांबळीही तयार होत. घोंगड्यासाठी सध्या बाजारपेठ म्हणजे कोकणपट्टी पश्‍चिम महाराट्रातील इतर भागात तुरळक ठिकाणी विक्री होत आहे. तसेच ग्रामीण भागातच मागणी असल्याचे सध्या चित्र आहे. यात पंढरपूर, आळंदी, महाड येथील मोठ्या यात्रेतून अजूनही घोंगडयाची बऱ्यापैकी विक्री होते. याच बाजारपेठेवर हा व्यवसाय टिकलेला दिसून येत आहे. शहरी भागात मात्र ग्राहकांनी कारखान्यात तयार होणाऱ्या आकर्षक रंगाच्या चादरी स्वीकारल्या. त्यामुळे ही मोठी बाजारपेठ घोंगड्याच्या हातून गेली आहे.

-Ads-

कापड-घोंगडी करण्याच्या पध्दती सारख्याच
हातमागावर कापड व घोंगडी करण्याच्या पध्दती सारख्याच आहेत. मेंढ्यांपासून मिळवलेली लोकर स्वच्छ केली जाते. ती पिंजून घेतली जाते. त्यानंतर चरख्याने सूत काढले जाते. लोकर स्वच्छ करणे, सूत काढणे आदी कामे महिलासुध्दा करतात. घोंगडी तयार करणाऱ्यांची संख्या कमी होत असून लोकरीचा दरही वाढला आहे. विणकाम करण्यासाठी 800 ते 900 रुपये खर्च येतो. सध्या बाजारात एका घोंगडीची किंमत 1500 ते 2 हजार आहे. लोकरीचा पेळू तयार करणे, घोंगडी विणणे यासाठी 400 ते 500 रुपये खर्च होतात. त्यामुळे या व्यवसायात फारशी आर्थिक प्राप्ती होत नाही. पूर्वी घोंगडी सर्रास वापरली जायची. मात्र, गेल्या काही वर्षात चादर, चटई, गादी हे प्रकार बाजारात आल्याने घोंगडी आपोआपच दुर्लक्षिली गेली. परंतु, डोंगराळ भागात काही प्रमाणात वापर सुरू आहे. थंडीला पर्याय म्हणून घोंगडीची भाळ मारली जायची.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)