पायउतार व्हायची वेळ आल्यावर विदुषकांना पाण्याची आठवण

आमदार जयकुमार गोरेंची अनिल देसाई, दिलीप येळगांवकरांच्यावर अप्रत्यक्ष टिका

खटाव / प्रतिनिधी 
गेली साडेचार वर्षे सत्ता असताना भाजपाच्या माण आणि खटाव तालुक्यातील विदुषकांना उत्तर माणच्या पाण्याची आठवण झाली नाही. आता सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आल्यावर त्यांना पाण्याचा कळवळा आला आहे, मात्र मतदारसंघातील जवळजवळ 90 गावात उरमोडीचे पाणी आणणारा आमदार जयकुमारच माणच्या उत्तर भागात पाणी आणेल असा जनतेतच विश्वास निर्माण झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे बाजारबुणग्यांच्या भूलथापांना कुणीच भूलणार नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच मतदारसंघात शेतकर्‍यांच्या हक्काचा साखरकारखाना लवकरच उभा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संभुखेड येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतन इमारतीचे भुमीपुजन झाल्यानंतर आयोजित वरकुटे-म्हसवड गणाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, माजी नगराध्यक्ष विजय धट, सरपंच मनिषा गुरव, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, राजकुमार पोळ, काकासाहेब माने, प्रकाश कापसे, अंकुश शिर्के, जयाप्पा कोळेकर गावोगावचे सरपंच, उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. गोरे पुढे म्हणाले, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ज्यांचे आजपर्यंत कधीच जुळले नाही, ज्यांचे आजपर्यंत कुठेच बुड स्थिर राहिले नाही आणि ज्यांनी कोणत्याच गावात एकही विकासकाम केले नाही, असे बहुरंगी विरोधक जयकुमारला रोखण्याचा एकमेव अजेंडा घेऊन एकत्र आले आहेत. त्यांना माण, खटावच्या विकासाचे देणेघेणे नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. उमेद संपल्यावर काहींना इथल्या रोजगाराची, आरोग्याची आणि ग्रीन माणची चिंता वाटायला लागली आहे. मायणी आणि वरकुट्याचे विदुषक आमचे सरकार , आमचे सरकार म्हणून मिरवत आहेत. जिकडे सत्ता तिकडे चांगभल म्हणणार्‍यांना जनता कधीच थारा देणार नाही.

गेल्या नऊ वर्षात गावोगावी जनतेने मागेल ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील 90 गावातील अंतर्गत रस्ते मंजूर करण्यात मला यश आले . गावोगावी स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालये, पाणी,वीज अशा मूलभूत सुविधांची अनेक कामे आपण मार्गी लावली आहेत. या मतदार संघात जयकुमारने पाणी आणले आणि म्हणूनच चार चार साखर कारखाने उभे राहिले आहेत. उरमोडीचे पाणी ज्या भागात पोहचले आहे, तिथल्या शेतकर्‍यांना चांगले दिवस आले आहेत. स्वार्थासाठी माण उत्तरच्या सोळा गावांचे पाणी विकणार्‍यांना चाळीस वर्षे सत्ता असूनही काही करता आले नाही.

दगडालाही आमदार करतो म्हणणारे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर तीन निवडणूकांत टिकले नाहीत. जनतेने माझ्या कामांवर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी मला आशिर्वाद दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात पाणी आणले. आताही लागेल तेव्हा पाणी आणतो आहे. उत्तर माणच्या जनतेलाही आता जयकुमारच पाणी आणू शकतो असा विश्वास वाटत आहे. येणारे सरकार आपलेच असणार, त्यामुळे या भागात मी निश्चित पाणी आणणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढून इथली इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)