पाबळमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या

ग्रामस्थांकडून गावबंद 


पोलीस चौकीला घेराव, पोलिसांवर कारवाईची मागणी


तणावामुळे काहीकाळ पाबळ बंद, राज्य राखीव दलास पाचारण

 

पाबळ/शिक्रापूर – शिरूर तालुक्‍यातील पाबळ येथील फुटाणवाडीतील नवनाथ बबन वरखडे (वय 33, रा. फुटाणवाडी, पाबळ, ता. शिरूर) या युवकाने शिक्रापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पाबळ औट पोस्टमधील कॉन्सटेबलने केलेल्या मारहाणीच्या नैराश्‍यातून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. यावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. तसेच पोलिसाने नवनाथला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करून गाव बंद करून संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करून परिस्थिती आटोक्‍यात आणली. तर या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फंत करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी दिल्यावर तणाव निवळला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाबळ येथील दत्तू शिनलकर आणि मयत नवनाथ वरखडे यांचा दोघांचा आर्थिक व्यवहार होता. या दोघांच्या झालेल्या आर्थिक कारणावरून शिनलकर यांनी 11 फेब्रुवारी रोजी पाबळ औट पोस्ट येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पाबळ पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी 12 फेब्रुवारीला नवनाथ याला दोनवेळा मारहाण केली आहे, असा आरोप मयत नवनाथच्या पालकांनी केला आहे. सातपुते यांनी नवनाथला दत्तू शिनलकर यांच्या संगनमताने मारहाण केली. त्यामुळे नवनाथ हा आत्महत्येस प्रवृत्त झाला. नवनाथने 15 फेब्रुवारीला विष प्राशन केले.

पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना दि. 17 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर पाबळ ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 19) पाबळ औट पोस्ट गाठले. पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करीत हवालदार प्रल्हाद सातपुते आणि दत्तू शिनलकर या दोघांवर कारवाईची मागणी केली. तसेच मृत्यू झाल्यानंतर त्याचा शवविच्छेदन अहवाल देखील बदलण्यात आल्याचे सांगत ग्रामस्थांनी गाव बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे पाबळ येथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर जाळून गाव आणि रस्ता बंद करत या घटनेचा निषेध व्यक्‍त केला. पाबळ येथे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गलांडे, शिरूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, सहायक निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक शिवशांत खोसे, प्रशांत माने यांनी पोलीस फौजफाट्यासह तातडीने पाबळ येथे धाव घेतली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याहून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिवसभर गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध केला.

शिक्रापूर पोलिसांचे चाललेय तरी काय?
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात दंगल होऊन यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशन चांगलेच चर्चेत आले आहे. या घटनेला दोन महिने देखील पूर्ण झालेले नाही. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. तरी देखील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे प्रकार घडत असल्याने शिक्रापूर पोलिसांचे चालले तरी काय? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

चौकशीसाठी विशेष पोलीस अधिकारी नेमणार
पाबळ (ता. शिरूर) येथे घडलेल्या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण होताच पोलीस उपअधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी पाबळ चौकी येथे सोमवारी (दि.19) दुपारी भेट दिली असता घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी आणि तपासासाठी विशेष उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहे. तसेच त्यांच्याकडे तपास देणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी सांगितले. तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)