पाप झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे भाजपसमोर लोटांगण

शिवसेनेची बदनामी केल्यास शिंगावर घेण्याचा इशारा ; शिवसेनेचे अनिल राठोड यांची जोरदार टीका

नगर –  “राजकीय स्वार्थासाठी स्वतःचा राजकीय पक्ष दावणीला बांधला. खायचे आणि दाखवायचे दात, त्यांनी पक्षाला दिलेल्या खुलाशावरून लक्षात आले आहे. राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे साटेलोटे पुन्हा एकदा नगरकरांना दिसले आहे. केडगाव हत्याकांडात यांची नावे उघड झाली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयावर यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या पापातून वाचण्यासाठी भाजपपुढे लोटांगण घालणारे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी शिवसेनेला बदनाम करत आहे. हे शिवसेना सहन करणार नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घेऊ,’ असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशला खुलासा करत शिवसेनेला महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. या खुलासा हस्यापद असल्याचे सांगून शिवसेनेचे राठोड यांनी राष्ट्रवादी-भाजपच्या “सोधा’ राजकारणावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे आदी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, “शहरात गुंडगिरी व दहशत निर्माण करून सत्तेसाठी “सोधा’ नेहमीच एकत्र आले आहेत. आपल्या जावयांना व आपल्याच घरच्यांना पदे पाहिजेत, असा अट्टाहास धरून आजही यांनी घरणेशाही कायम ठेवली आहे. शिवसेनेने त्यांचे मनसुबे अनेकवेळा उधळून लावले आहेत.’ केडगाव पोटनिवडणुकीत भाजपला अवघी 151 मते मिळाली होती. डिपॉझिट जप्त झाले होते. तेथे त्यांची नाचक्की झाली. एकही पदाधिकारी फिरकला नाही. उलट त्यांनीच कॉंग्रेसच्या उमेदवाराला आतून मदत केली. सेटलमेंट केली. तेथे सुध्दा त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली. या निवडणुकीनंतर दोन शिवसैनिकाची हत्या झाली. त्यामध्ये या “सोधा’ व त्यांच्याच कार्यकर्त्यांचा सहभाग झाल्याचे उघड झाले.

राज्यात नव्हे तर देशाला लाजीरवाणी घटना ठरलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्लाही यांच्याच लोकांनी केला. आजही हा खटला चालू आहे. या सोयऱ्यांनी षडयंत्र रचून पुन्हा दहशत, दादागिरी सुरू केल्याचा आरोप राठोड यांनी यावेळी केला आहे.

राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने काही प्रवृत्तींना हाताशी धरून महापालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी, अशी छुपी आघाडी त्यांनी केली. दोन्ही पक्षाचे तिकीट वाटण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत या दोघांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, जनतेने शिवसेनेवर विश्‍वास ठेवून सर्वाधिक जागा शिवसेनेला दिल्या. यामध्ये भाजपचे पानीपत झाले. निवडणुकीच्या तोंडावर कोतकर गटाला भाजपमध्ये पावन करून घेत भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. नगरच्या जनतेला हेच रूचले नाही. म्हणून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. “बुऱ्हानगर’मधून सूत्र हलविणारे हे आघाडीसह भाजप पक्ष चालवितात, हेही या महापालिकेच्या निवडणुकीत पुढे आले आहे. या महापौर निवडणुकीमध्ये आर्थिक तडजोडीतून यांनी एकत्रितपणे येऊन सत्ता स्थापन केली.

अभद्र अशी युती या महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला पांठीबा देऊन केली. आता हेच राष्ट्रवादीवाले शिवसेनेवर टिका करायला निघालेत. ज्यांची बोलण्याची लायकी नाही, ज्यांना पक्षाची धेयधोरणे कळत नाहीत, असे आता स्वतःचा बचाव करण्यासाठी बोलू लागले आहेत, यासारखे दुर्दैव नाही, असेही राठोड म्हणाले.

राष्ट्रवादीने वरिष्ठ स्तरावर त्यांच्या नगरसेवकांना कारवाई करून नोटीसा बजावल्या आहेत. या खुलाशाच्या बातम्यातून शिवसेनेवर गरळ ओकून आपले पाप व कृत्य झाकण्यासाठी शिवसेनेला बदनाम केले जात आहे. जे कधीही कोणत्या पक्षाचे झाले नाही, ते “सोधा’ जनतेचे कधीच होणार नाहीत. ज्यांची केडगाव हत्याकांडात नावे आली आहेत त्यांनी या खटल्यातून आपण कसे सुटू, याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपबरोबर जावून आपली यातून सुटका करून घ्यायची, हेच या महापालिकेच्या निवडणूकीत घडलेल्या घटनेतून सिध्द होत असल्याचेही राठोड म्हणाले.

दादांविरोधात यांचाच राजकीय डाव!

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आदेश यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, स्वार्थासाठी व आपल्या बगलबच्चांचे पाप धुण्यासाठी धुडकावले. भाजपच्या दारी यांनी लोटांगण घातले. बहुधा त्यांना याशिवाय पर्याय राहिला नव्हता, असे वाटते. भाजपने आपले तत्व, निष्ठा सोडून गुंडगिरी, दहशतीला साथ देऊन महापालिकेत व या शहरात राष्ट्रवादी पक्षाशी नवा अध्याय सुरू केला. ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिशाभूल केली, स्थानिक पातळीवर प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षाचे काम करणारे दादा कळमकर यांना सुध्दा अडचणीत आणले आहे. त्यांचे राजकीय आयुष्य बरबाद करण्याचा डाव उघड झाला आहे. जे शरद पवारांना फसवतात ते नगरच्या जनतेच्या डोळ्यात धुळफेकच करणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

गिरवलेंच्या मृत्यूस जगताप पिता-पुत्रच जबाबदार

शिवसेनेच्या त्रासाला कंटाळून आम्ही भाजपला पाठिंबा दिला, असा त्यांनी खुलासा केला, हे अतिशय चुकीचे व हस्यास्पद आहे. विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा दिल्याचे ते सांगत होते. तर खुलासा वेगळा कसा झाला? पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करण्यासाठी पिता-पुत्रांनी यांच्याच कार्यकर्त्यांना बोलावून घेतले व स्वतः बाजूला राहून, त्यांना पुढे केले. त्यांचे संसार या पितापुत्रांनी उद्‌ध्वस्त केले आहे. याला हे पितापुत्रच जबाबदार आहेत. कैलास गिरवले यांना यांनीच झोपेतुन बोलावले व पुढे जे कृत्य घडले त्यात कैलास गिरवलेंचा बळी गेला याला सुध्दा हेच जबाबदार आहेत, असा घाणाघातही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे. या प्रकरणांचे धागेदोरे सुध्दा उघड झाले आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)