“पापमुक्‍ती’ हवीच पण..!

– आळंदीला पाणी पुरवठ्यास कार्योत्तर मंजुरी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दिवसाआड दोन लाख लीटर पाणी पुरवठा करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आळंदीला पाणीपुरवठा करण्यास सहमती दर्शवली. तसेच, पिंपरी-चिंचवडकरांना “पापमुक्‍ती’ हवीच…पण, आळंदीला पाणी पुरवठा करणारी इंद्रायणी नदी का प्रदुषित होते? त्यावर कोणत्या उपाययोजना करणार? याचा अभ्यास प्रशासन करणार आहे का? इंद्रायणीची प्रदूषणातून मुक्‍तता कधी होणार? असा प्रश्‍नही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिका हद्दीतील चिखली, जाधववाडी व कुदळवाडी आदी भागांतील कारखाने, औद्योगिक कंपन्यांसह नागरी परिसरातील मैला व रसायनमिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणीचे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. “”पिंपरी-चिंचवडकरांच्या पापामुळेच इंद्रायणी नदीचे प्रदूषण झाले आहे. परिणामी, आळंदीकरांना दूषित पाणी पुरवठा होत आहे”, असे वक्‍तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीतील जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आळंदी नगरपरिषदेला पाणी पुरवठा करण्याबाबत पुढाकार घेतला होता.

आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी दररोज आणि एकादशी अथवा लग्न समारंभासाठी हजारो नागरिक येत असतात. तसेच, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. भाविकांमध्ये इंद्रायणी पवित्र मानली जाते. या नदीमध्ये स्नान केले जाते, तसेच तीर्थ म्हणून नदीचे पाणी प्राशन केले जाते. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आळंदीसाठी प्रतिवर्षी सुमारे एक महिना पाणीपुरवठा केला जातो. त्याच पाईपलाईनमधून सुमारे 1 महिना आळंदी नगरपरिषदेस नि:शुल्क पाणीपुरवठा करण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.

आळंदी नगरपरिषदेस पिंपरी-चिंचवड महापालिका आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान सात दिवस दररोज 50 हजार लीटर याप्रमाणे 2.50 रुपये प्रति 1 हजार लीटर या दराने शुल्क आकारुन पाणीपुरवठा करते. त्याधर्तीवर सध्या 1 महिन्याच्या कालावधीकरिता 2.50 रुपये प्रति 1 हजार लीटर निवासी दराने दिवसाआड 2 लाख लीटर इतका पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, आळंदीस पाणीपुरवठा करण्याबाबत आमचा विरोध नाही. पण, इंद्रायणीसह पवना नदीच्या प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन काय करणार? असा सवाल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. तसेच, विरोधीपक्ष नेते योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम, दत्ता साने, संदीप वाघेरे, प्रमोद कुटे, आशा शेंडगे, प्रज्ञा खानोलकर, सारिका बोऱ्हाडे आदी सदस्यांनी या विषयातील चर्चेत आपआपले मत मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)