पाथर्डी पालिका सभेत एलइडी कामांबाबत नाराजीचा सूर

टॅंकर बंद न करण्याची जोरदार मागणी ः घंटागाडीबाबत अनेक तक्रारी
पाथर्डी – शहरात झालेले एलइडी दिव्यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप, कचरा संकलनासाठी घंटागाडी न येणे, शौचालय बांधूनही लाभार्थ्यांचे थकलेले हप्ते, अनियमित वअशुद्ध पाणी पुरवठा, अशा मुद्‌द्‌यांवरुन पालिकेची शनिवारची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली.
विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही पालिकेच्या व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्‍त केली. कामात सुधारणा करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
पालिका सभागृहात नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभा झाली. उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, प्रवीण राजगुरु, प्रसाद आव्हाड, अनिल बोरुडे , महेश बोरुडे, नगरसेवक दीपाली बंग, मंगल कोकाटे, संगीता गट्टाणी, सुनीता बुचकुल, सविता भापकर, मनीषा आंधळे, शारदा हंडाळ, सविता डोमकावळे, दुर्गा भगत, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यावेळी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच विषय पत्रिकेवरील एकूण चार विषयांपैकी लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग ट्रॅक येथे गार्डन लॉन्स व संत वामनभाऊ नगर येथे बंदिस्त गटारीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. नगरसेवक दीपाली बंग, सविता भापकर, नगरसेवक प्रवीण राजगुरु, प्रसाद आव्हाड यांनी शहरात झालेल्या एल.इ.डी. दिव्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्‍तकेली. संबंधित कामे निकृष्ट आहेत, असा आरोप करत शहरातील अनेक भागात बंद झालेले दिवे तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.
पावसाळा सुरू झाला तरी त्या तुलनेत पाऊस झालेला नाही. यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याशिवाय वाड्या वस्त्यांवरील टॅंकर बंद करु नये, अशी मागणी आरोग्य विभागाचे सभापती नामदेव लबडे यांनी केली. नगरसेवक प्रवीण राजगुरू म्हणाले, की शहरातील अनेक उपनगरात घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. घंटागाडीवर ध्वनिक्षेपक नसल्याने नागरिकांना गाडी येऊन गेल्याचेही कळत नाही. पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. पाणी साठलेल्या ठिकाणी व गटारीत जंतुनाशक पावडर, धूर व औषध फवारणी करावी. सावता नगर, अर्जुन बाबानगर येथील एल. इ. डी. दिव्यांचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी झाले. परंतु ते अद्यापही बंद आहेत. ते तात्काळ सुरू करून शहरातील बंद दिवे दुरुस्त करावेत, अशीही मागणी राजगुरू यांनी केली .
नगरसेवक सुनीता बुचकुल म्हणाल्या, गेल्या आठ ते दहा दिवसांतून एकदाच घंटागाडी तनपुरवाडीत येते. पिण्याचे पाणीदेखील अशुद्ध व नियमितपणे येत नाही. संबंधितांनी कामात सुधारणा करावी. नगरसेवक मंगल कोकाटे म्हणाल्या, शौचालय गरीबांना दिले की मोठ्या बंगलेवाल्यांना हेच नेमके कळेना झाले आहे. योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळून कामे गतिमान पद्धतीने व्हायला हवीत.
नगरसेवक सविता भास्कर म्हणाल्या, 8 ते 10 महिन्यांपासून आम्ही शौचालयाच्या हप्त्यासंदर्भात मागणी करतोय. परंतु संबंधित विभाग प्रमुख याची कुठलीही दखल घेत नाही. शेकडो नागरिकांचे हप्ते थकूनही प्रशासन सुस्त आहे. याची मुख्याधिकारी यांनी दखल घ्यावी अन्यथा पालिकेवर भव्य मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
महिला व बालकल्याण विभाग सभापती दीपाली बंग म्हणाल्या,
तब्बल दीड कोटी खर्च करून बसवलेले एल. इ. डी. दिवे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. यामध्ये नगराध्यक्ष यांच्या घरा शेजारील व उपनगराध्यक्ष यांच्या हॉटेलसमोरील विद्युत दिव्यांचाही समावेश आहे. संबंधित कामाची चौकशी व्हायला हवी.
संगीता गट्टाणी म्हणाल्या, नाथनगर येथील काही भागात अशुद्ध पाणी येत आहे. काही खांबावरील विद्युत दिवे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. विजय नगर व मुंडेनगर येथे नियमित पाणी व मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नगरसेवक अनिल बोरुडे म्हणाले, कसबा विभागात घंटागाडी गेल्या काही दिवसांपासून उशिरा येते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी सकाळी घंटागाडी लवकर पाठवावी. तसेच घंटागाडी आल्याचे नागरिकांना समजण्यासाठी गाडीला स्पीकर बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे म्हणाले, की शौचालयाचा पहिला व दुसरा हप्ता न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एकूण लाभार्थ्यांची मंजूर संख्या, यापैकी लाभ मिळालेले व त्यापासून वंचित राहिलेले याची सविस्तर टिपणी संबंधित विभागांनी तयार करावी . त्याची माहिती सर्व सदस्यांना होण्यासाठी त्याच्या झेरॉक्‍स प्रती सर्व सदस्यांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. काही भागात घंटागाडी नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या कामाशी संबंधित असलेल्यांना कामात सुधारणा करण्याचा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)