पाथर्डी तालुक्‍यात 80 वर्गखोल्या धोकादायक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर : जिल्हा प्रशासनाची मात्र डोळेझाक
पाथर्डी – पाथर्डी तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या एकूण 288 प्राथमिक शाळा आहेत. शाळेच्या एकूण 985 खोल्यांपैकी 80 खोल्या धोकेदायक बनून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाथर्डी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वसू या 600 ते 700 लोकवस्ती असलेल्या छोट्याशा गावच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. बाहेरून नेहमीच रंगीबेरंगी सर्वसाधारण शाळेसारखीच वाटणारी ही छोटीशी शाळा जवळून पाहिल्यानंतर अत्यंत विदारक चित्र समोर आले.
वसू गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने धोकादायक बनली आहे. पावसाळ्यात वरून कुजलेले पत्रे गळतात, तर खालून अंगणात साठलेले पाणी वर्गात शिरते. वादळ वाऱ्याने तर अख्खे विद्येचे मंदिर उग्र रूप धारण करते. अशा महाभयानक परिस्थितीत शाळाखोल्या सोडून विद्यार्थ्यांना शेजारील महादेवाच्या मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल करण्यात शिक्षण विभागाला यश आलेले असतानाच दुसरीकडे मात्र शाळाखोल्यांच्या दुरवस्थेमुळे चिमुकल्यांना सुरक्षित ठेवण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे. अशा गंभीर प्रश्नाकडे शिक्षण विभागाचे अधिकारी सोयीस्कर डोळेझाक करताना दिसतात.
दोन शिक्षकी शाळेला पत्र्याच्या दोन खोल्या आहेत. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत परिसरातील 21 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची जुनी इमारत असल्याने भिंतीला ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. भिंतीला पडलेल्या चिरांमध्ये साप, विंचू ,पाली यांचे वास्तव्य असते. दोनपैकी एका शाळाखोलीची प्रचंड दयनीय अवस्था झालेली आहे. छतावरील पत्रे अक्षरशः सडल्यामुळे शाळेवरील छत असून नसल्यासाखे आहे.
छताची नटबोल्टने केलेली फिटिंग संपूर्ण खिळखिळी झाल्याने हलक्‍याशा वाऱ्याच्या झुळकीनेही शाळेच्या पत्र्यांचा मोठमोठ्याने आवाज होतो. वादळ वारा सुटला तर शिक्षकांची व विद्यार्थ्यांची होणारी अवस्था भयानक असते. पालकांच्या मनातही घरी वादळ, वारा व पाऊस उघडेपर्यंत धडकी भरलेली असते. पाऊस व वाऱ्याचा वेग वाढला की उंचीवरील खोलीही धोकादायक बनते. अशा वेळेस शेजारील महादेवाच्या मंदिरात शिक्षकांसह मुलांना आसरा घ्यावा लागतो.
स्वच्छतागृहाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. शाळेला पाण्याची व्यवस्था नसल्याने स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य होऊन भयानक दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण देत आहे. तर, मुलांना पिण्यासाठीही पाणी घरून आणावे लागते. महादेवाच्या मंदिरासमोर गावातील लग्नसमारंभ होतात. उन्हाळी सुट्टीत तर शाळा व मंदिर परिसराला मंगल कार्यालयाचे रूप आलेले असते. उष्टे अन्न व फेकलेल्या पत्रवाळ्या, त्यात कुत्र्यांच्या झुंडी अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस सुरू होतो. मोठ्यांनी केलेली घाण चिमुरडे आपल्या हाताने स्वच्छ करून पहिल्याच दिवशी उद्याची उज्ज्वल पिढी स्वच्छतेचा धडा गिरवतात.
ग्रामस्थांनी लाखोंची लोकवर्गणी करून शाळेशेजारी महादेवाचे भव्य मंदिर बांधले. रंगरंगोटी केली. मात्र, त्याच शेजारी पुढील पिढीचे भविष्य घडवणारे विद्यामंदिर मात्र अखेरची घटका मोजत आहे हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)