पाथर्डी जगदंबा मंदिर परिसर सुविधांपासून वंचित

पाथर्डी – शहरातील आनंदनगर भागातील जगदंबा देवी मंदिर परिसरात मूलभूत नागरी सुविधांची कमतरता आहे. पालिकेने पाणी, रस्ते, भुयारी गटारी या सुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे केली आहे.

मागण्यांची पूर्तता न झाल्यास पालिकेविरोधात सोमवारी उपोषण करण्यात येणार आहे. आनंदनगर भागातील जगदंबा देवी मंदिर परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होत असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. पालिकेची कचरा संकलन गाडी वेळेवर येत नसल्यामुळे परिसरातील नागरिक कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. रस्त्यावर भूमिगत गटार नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिसरात पालिकेचा मोकळा भूखंड आहे. यावर आजूबाजूच्या नागरिकांकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा समस्या नागरिकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे मांडल्या.

लहान मुलांसाठी पालिकेने मोकळ्या भूखंडावर उद्यान उभारावे, मंदिर परिसरातील रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करावा, घंटागाडी वेळेवर यावी, भूमिगत गटार योजना राबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 2005 सालापासून परिसरातील नागरिक पालिकेकडे विविध मागण्या करत आहेत. परंतु, पालिकेकडून नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ निवडणुकीपुरते संबंधित तोंड दाखवायला येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांचे निवेदन नगरविकास राज्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. पालिकेकडून मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून परिसरातील नागरिक उपोषण करणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली. मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)