पाथर्डीत मनसेचे ठिय्या आंदोलन

पाथर्डी – तालुक्‍यावर भीषण दुष्काळाचे संकट आले असून या दुष्काळाच्या झळा नागरिकांसह वन्य प्राण्यांनाही बसत आहेत. त्यामुळे वन विभागामार्फत तालुक्‍यातील शिरसाटवाडी येथे वन विभागाच्या हद्दीत पाणवठे तयार करून प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी या प्रमुख मागणीसाठी आज ( दि.3) मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग कार्यालयात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलक वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन करत असताना कार्यालयात निशिकांत भोकरे नावाचे लिपिक उपस्थित होते. वनविभागाच्या कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक चांगलेच संतप्त झाले.
यावेळी बोलताना अविनाश पालवे म्हणाले, तालुक्‍यावर सध्या भीषण दुष्काळाचे संकट कोसळले आहे. वन्य प्राणी पाण्यासाठी लोकवस्तीत येऊ लागले आहेत, मात्र वनविभागाला याचे काहीच देणेघेणे नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बैठकांच्या नावाखाली अधिकारी कार्यालयात नेहमीच गैरहजर असतात. तालुक्‍यात राजरोस वृक्षतोड होत असताना याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था वनविभागाने जबाबदारीने करायला हवी होती. मात्र या विभागात कुणाचाच कोणाला पायपोस राहिलेला नाही. परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने लांडगा, कोल्हा, हरिण, मोर, तरस, रानडुक्कर यांसह विविध वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावात येत आहेत.

यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या वन्य प्राण्यांपासून जर कोणाला काही ईजा झाली, दुर्घटना झाली तर यास संपूर्णपणे वन विभाग जबाबदार राहील. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. लिपिक भोकरे यांनी वनपाल महादेव राठोड यांच्याशी पालवे यांचे फोनवर बोलणे करून दिले.

वनक्षेत्रपाल शिरीष निरभवने हे नगर येथे मीटिंग साठी गेलेले आहेत, उद्या आम्ही पाणवठे सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करू व 8 दिवसात पाणवठे सुरू करू असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात लक्ष्मण शिरसाट, अशोक शिरसाट, अतुल सानप, अंकुश शिरसाट, बाबासाहेब शिरसाट, नामदेव खाडे, अशोक फुंदे, अंबादास शिरसाट, रामनाथ खाडे, अमोल शिरसाट, सुदर्शन शिरसाट, नितिन शिरसाट यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)