पाथर्डीत भारनियमनाच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा

पाथर्डी – शहरात अन्यायकारक व मनमानी पद्धतीने अचानक वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केल्याने जनजीवन पुर्णपणे ठप्प झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरक्षेकडे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंतांना स्वतंत्रपणे आंदोलनाचे निवेदने दिली तर भाजप कार्यकर्त्यांनी घेराओ घालुन भारनियमन बंद करण्याची मागणी केली.
शहरात पहाटे पाच ते साडेआठ, सकाळी 11 ते दुपारी 2 व सायंकाळी सात वाजल्यापासुन पासुन साडे नऊ पर्यंत भारनियमन सुरू झाल्याने वीज पुरवठा असुन नसुन सारखाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटे साडेचार पासुनच मोहटादेवी, धामणगाव, गाडगे आंबराई अदिसह सर्व देवी मंदिरात पहाटे आरती संपन्न होते. नगर, बारामती, पैठण, औरंगाबाद, श्रीरामपुर, बीड, अशा ठिकाणांहुन भाविक पायी चालत मोहटादेवी दर्शनाला येतात. अहोरात्र भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फुलुन जातो. यामध्ये महिलांची संख्या मोठी असते. रस्त्यावर छेडछाडीचे प्रकार सुरू होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन सणासुदीच्या दिवसात बाजारपेठ शांत असुन सायंकाळी जेमतेम गिऱ्हाईक असते. त्यावेळी भारनियमन सुरू होते.
भारनियमनाला जोडून खंडित विजपुरवठा होऊन कोणतेच काम सुरूळीत होत नाही. बॅंका पतसंस्था, शासकीय कार्यालये, सहकार संस्था, बाजार समिती, या ठिकाणचे व्यवहार ठप्प होतात. जनित्राचा खर्च परवडत नसल्याने तासभर जनित्र चालवुन तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. प्रचंड उकाडा, तहान व रांगेत उभा राहुन वैतागलेले ग्राहक शिव्या शाप देऊ लागतात. थकबाकीचे कारण देऊन वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केले असुन प्रामाणिकपणे वीजबील भरणा करणारे सुरळीत वीज पुरवठयापासुन वंचित राहात आहेत. यापूर्वी राबवली तशी वीजजोड खंडित मोहिम राबविल्यास आठ दिवसात थकबाकीची लक्षणीय वसुली होणार आहे.
मंगळवारी सकाळी भाजपचे राहुल कारखेले, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे ऍड.सतिष पालवे, भाजप किसान आघाडीचे बाळासाहेब ढाकणे, युसुफ शेख, पिराजी किर्तने, मोहटेचे माजी सरपंच संतोष दहिफळे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, आदिसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सहाय्यक अभियंता निलेश मोरे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे मागण्या पाठवितो असे सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वीज वितरण कंपनीची मनमानी जनतेवर अन्यायकारक ठरत असुन भारनियमन रद्द न केल्यास पुर्व सुचना न देता आंदोलनाचा इशारा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, नगरसेवक बंडू बोरूडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष चंद्रकांत मरकड, शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक चॉंद मन्यार, योगेश रासने, अजित चौनापुरे, दिगंबर गाडे आदींनी दिला आहे. तर मनसेच्या वतीने शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, व अन्य कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन भारनियमन त्वरीत बंद करण्यात यावे. दसरा दिवाळी सणांचा विचार वीज वितरण कंपनीने करावा. दुष्काळी परिस्थिती, शहरात भुरट्या चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण या समस्यांचा विचार करून भारनियमन तातडीने रद्द करावे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरातील वीज ग्राहकांचा वीजपुरवठयासाठी कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो. एवढी नाजुक व संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)