पाथर्डीत बदलत्या घडामोडींनी राजकीय स्थिती दोलायमान…

माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या अकाली निधनामुळे सक्षम व संघर्षशील नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांची लोकसभा निवडणुकीसाठीची तालुक्‍यातील मोर्चेबांधणी, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍड. प्रतापराव ढाकणे यांचे निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांची विधानसभेसाठीची सुरू असलेली चाचपणी, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांचा योग्य संधीचा सुरू असलेला शोध, शिवसेनेकडून मतदारसंघात विधानसभेला स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी, आदी राजकीय घडामोडींमुळे तालुक्‍यातील राजकीय परिस्थिती अस्थिर व संभ्रमावस्था निर्माण करणारी बनली आहे. 

एकेकाळी राजळे व ढाकणे या प्रस्थापित घराण्यांभोवती फिरणारे राजकारण आता विखे – घुले यांच्या आश्रयाला असलेल्या विस्थापितांच्या नावाच्या चर्चेने ढवळून निघाले आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय संक्रमण काळातून तालुक्‍यात नवीन नेतृत्व उभे राहू शकते. या शक्‍यतेने अनेकांनी चाचपणी सुरू केल्याने सध्याची राजकीय परिस्थिती चर्चेचे गुऱ्हाळ बनली आहे. अस्थिर झालेले राजकीय वातावरण भविष्यकाळात स्थिर होताना वेगळ्या वळणावर पोहोचेल काय? याची उत्सुकता सध्या तालुक्‍यातील जनतेला लागली आहे.

स्व. राजळेंची पोकळी भरून काढण्यासाठी आ. मोनिका राजळे यांनी संपूर्ण ताकदीने राजकीय मैदानात उडी घेतलेली आहे. आ. राजळे कुटुंबाचा राजकीय वारसा समर्थपणे चालवतील, असे चित्र प्रथमदर्शनी त्यांनी सुरू केलेल्या झुंजार कामगिरीने व जनसंपर्कामुळे वाटते. आ. राजळेंच्या सक्रियतेनंतर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, विधानसभेसाठीचे पक्षांतर्गत इच्छुक विरोधक यांच्यासह राजळे समर्थकही सध्या आ. राजळे यांच्या राजकीय कार्यशैलीचा व कार्यक्षमतेचा लक्षपूर्वक अभ्यास करत योग्य संधीची वाट पाहत आहेत. आ. राजळे यांना नेतृत्व सिद्धतेसाठी या काळात अनेक दिव्य पार करून सिद्ध व्हावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा काळ तालुक्‍यातील राजकीय उलथापालथीचा मानला जातो.

भाजप पक्ष नेतृत्वाची सर्व सूत्रे हातात घेऊन आ. राजळे यांनी जोमात काम सुरू केले असले तरी भाजपामधील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची परंपरागत गटबाजी आ. राजळे संपवू शकतील काय? स्व. राजळे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढतील काय? भविष्यात राजळे कुटुंबाकडून आ. राजळे की राहुल राजळे या दोघांपैकी कुणाला पुढे केले जाईल? डॉ.विखे कुठल्या पक्षाकडून लोकसभा लढवतील? ऍड.ढाकणे लोकसभा लढवतील की विधानसभा? अभय आव्हाड व शिवशंकर राजळे यांचे आगामी राजकारणातील स्थान काय? असे अनेक प्रश्न भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतच्या राजकीय चर्चेत महत्त्वाचे ठरत आहेत.

आमदार राजळे यांना राजकीय दबदबा निर्माण करण्यास अपयश आल्यास तालुक्‍यातून नवीन नेतृत्व निर्माण होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, असे अंदाज बांधत पक्षांतर्गत ज्येष्ठांनी वेगळी चूल मांडण्याचे मनसुबे रचले आहेत. तर, राजळेंचे परंपरागत राजकीय विरोधक ऍड. प्रताप ढाकणे यांचीही योग्य वेळ साधून निवडणूक लढविण्याची भूमिका याच वातावरणातील एक भाग असल्याचे मानले जाते. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे यांच्याही हालचाली याला अपवाद नाहीत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ते कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या भूमिकेमुळे तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांना जवळ घेऊन विखे यांनी आगामी विधानसभेला घुले व राजळे या दोघांनाही आव्हान उभे केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

विखे यांची तालुक्‍यातील ताकद सध्या तरी स्वतंत्र आहे. ही शक्ती विधानसभेच्या निवडणुकीत विखे कुणाच्या मागे उभी करणार? की स्वतंत्र उमेदवार देऊन आपले स्वतंत्र अस्तित्व कायम करणार? याही प्रश्‍नांची उत्तरे आगामी राजकारण अस्थिर करण्यास कारणीभूत ठरत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीत गेलेले माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे यांनी नुकताच वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देत निर्माण केलेल्या तणावातून आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. छोटी संधी मिळताच शिवशंकर राजळे यांनी घेतलेली भूमिका आगामी राजकीय घडामोडीत आणखी स्फोटक वाटचालीचे संकेत देतात.

माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचा गुणगौरव सोहळा व माजी आमदार कै. माधवराव निऱ्हाळी यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्ताने ऍड. प्रताप ढाकणे यांनी सर्वपक्षीय नेतेमंडळींना एका व्यासपीठावर बोलवत आपली राजकीय भूमिकेतील गुढता वाढवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य-दिव्य कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील विविध पक्षांची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ढाकणे अध्यक्ष असलेल्या एकलव्य शिक्षण संस्थेचा हा कार्यक्रम असला तरी राजकारणातील पुढील वाटचालीसाठी ढाकणे यांना या कार्यक्रमातून संजीवनी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीपूर्वी एका समारंभात आपण आगामी निवडणूक लढवणार असल्याची जाणीवपूर्वक घोषणा करून ढाकणे यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत कमालीची उत्सुकता वाढवली आहे. घुले यांनी शेवगाव तालुका मजबूत करून पाथर्डी तालुक्‍याच्या मतविभागणीसाठी डमी उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. घुलेंच्या नियोजनातील उमेदवार कोण असेल? कोणामुळे काय बदल होतील? कोणी निवडणूक लढवली तर कुणाचा तोटा होईल? या चर्चा रंगत आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख यांनीही तालुक्‍यात झालेल्या कार्यक्रमादरम्यान शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्याने तालुक्‍यातील विधानसभा इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. कुठेच नाही तर शिवसेनेचा उमेदवार होऊन लढू, अशा भूमिका इच्छुक समर्थक व्यक्त करत असल्याने राजकीय गोंधळ वाढतोय. एकंदरीतच तालुक्‍यातील राजकीय हालचालीने वातावरण संभ्रमावस्थेत आहे.

 

बाबासाहेब गर्जे

प्रतिनिधी, पाथर्डी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)