पाथर्डीत एकाच रात्रीत चार दुकाने फोडली

हजारो रुपयांचा ऐवज चोरीस
पाथर्डी – शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी शहरासह तालुक्‍यात भुरट्या चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याने तालुक्‍यात चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शहरातील भाजी बाजार तळावर गुगळे हॉस्पिटल समोर असलेल्या नगरपालिकेच्या गाळ्यातील अशोक कारभारी काकडे यांच्या गुरुकृपा ट्रेडर्स या कृषी साहित्य विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 40 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरांनी चोरून नेला. सोमवारी रात्री ही घटना घडली. दुसऱ्या दिवशी पहाटे काकडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली, त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. त्याच दिवशी काकडे यांच्या शेजारील तानाजी संतराम पाटील यांचे सप्तरंग फोटो स्टुडिओ, अमित राजेंद्र चौनापूरे यांचे चहाचे दुकान, मुरलीधर सावळेराम सुडके यांचे जगदंबा स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी हजारो रुपये लंपास केले. याबाबत अशोक कारभारी काकडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन फिंगरप्रिंटचे नमुने घेतले. त्याचबरोबर डॉग स्कॉड बोलावून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
रविवारच्या रात्री प्लास्टिक व्यावसायिक वसीम लियाकत मणियार (रा. मौलाना आझाद चौक) घरात झोपले असताना चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून शर्टच्या खिशातील 15 हजार रुपये चोरून नेले . याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात झालेल्या दुकाने व घरफोड्याचा तपास पोलीस हवालदार आर.एन. चव्हाण करीत आहेत. शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत. पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेल्या आर्थिक संबंधांमुळे तालुक्‍यात कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. शहरात चोऱ्या, घरफोड्या ,भुरट्या चोऱ्या, खिसेकापू, चेन स्नेकर, लुटालुट, फसवणुकीच्या घटनात दिवसोंदिवस वाढत आहेत. तालुक्‍यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)