पाथर्डीतील नाथनगरात जुगार अड्ड्यावर छापा

2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

9 जणांना अटक; रात्रीच जामिनावर सुटका

पाथर्डी – शहरातील नाथनगर भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेसात वाजता छापा टाकला. 97 हजार रुपये रोख, दुचाकी, मोबाइल असा 2 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

शहरातील नाथनगर भागातील एका खोलीत काही लोक तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. माहितीच्या आधारे निरीक्षक पवार यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार योगेश गोसावी, सुनील चव्हाण, उमेश खेडकर, पोलीस नाइक भागीनाथ पंचमुख, संदीप पवार, रावसाहेब हुसळे, योगेश सातपुते यांच्यासह छापा टाकला.

मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास नाथनगर भागात ही कारवाई करण्यात आली. छाप्यात पोलिसांनी 97 हजार रुपये रोख, तीन दुचाकी वाहने, मोबाइलसह 2 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. राजू पवार, सुनील महाजन, शंकर पवार, बजरंग पवार, अशोक पवार, आजिनाथ पवार यांच्यासह इतर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच त्यांची जामिनावर मुक्‍तता करण्यात आली.

छापा संशयाच्या भोवऱ्यात

स्थानिक गुन्हे शाखेचा हा छापा संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पथकातील पोलिसांनी रोख रकमेवर मोठा हात साफ केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या छाप्यात किमान चार ते पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)