पाण्यासाठी 120 शेतकऱ्यांचे मुंडण

रेडा/निमसाखर- नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुमारे 120 शेतकऱ्यांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. दरम्यान, या आंदोलकांची आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली. अन्‌ उपोषणकर्त्यांसमोरच थेट जलसंदपदामंत्री गिरीश महाजन यांना दुरध्वनीद्वरे येथील परिस्थितीचे विश्‍लेषण केल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी पाणी सोडण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले.
नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदी पात्राताच निरवांगी येथे गुरुवार (दि. 22) पासून इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. 20) रास्तारोको आंदोलन केले होते. तरी शासनाला जाग न आल्याने शेतकऱ्यांनी गुरुवार (दि. 22) पासून बेमुदत उपोषण सुरू केले. तर शुक्रवारी (दि. 23) काळ्या गुढ्या तर शनिवारी ही नदीकाठच्या गावांनी गाळ्या गुढ्या उभारल्या व गाव बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदविला.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शासनाकडे 155 कि.मी लांबीमध्ये नदी कोरडी असून नदीमध्ये 4 टीएमसी पाणी सोडण्याची गरज असल्याचा अहवाल पाठविल्यामुळे शासनाची पाणी सोडण्याची भूमिका नव्हती. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी संर्पक साधला व सध्या धरणामध्ये सुमारे 63 टीएमसी पाणीसाठा असून यातील दोन ते अडीच टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. केवळ अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये सोडल्यास इंदापूर, माळशिरस व फलटण तालुक्‍यातील 28 गावातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या, जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार असल्याचे सांगितल्यानंतर महाजन यांनी तातडीने पुणे व सोलापूर जिल्हातील जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे फोनवरुन कळविले. यावेळी पाटील यांनी सांगितले की, सोमवारी (दि. 26) विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या माध्यमातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सरकारकडे मागणी करुन मुख्यमंत्र्याकडे ही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, पाटबंधारे विभागाचे अधिकारी शासनाला खोटी माहिती देवून दिशाभूल करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न ही ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याने जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे केली आहे.दरम्यान, माने यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची काळजी घेवून त्यांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला संघटना, नागरिक पाठिंबा देत असून आज सरकारमधीलच शिवसेनेने पाठिंबा जाहिर केला आहे. आज शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख डॉ. राजेंद्र काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व शिवसेना कायमच शेतकऱ्याम्च्या हितासाठी रस्त्यावर येत असते. मग आम्ही सरकारमध्ये असो की विरोधी पक्षात बळीराजासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत. तसेच पाण्यासाठी जलसंपदाराज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या संपर्क साधून लवकरच हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे काळे यांनी आश्‍वासन दिले.

  • तीन शेतकरी रुग्णालयात दाखल
    नीरा नदीत पाणी सोडण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज (रविवार) चौथा दिवस होता. या उपोषणास 16 शेतकरी बसले असून यातील अजिनाथ कांबळे (वय 79) व शंकर होळ (वय 72) या दोन शेतकऱ्यांना इंदापूर उपजिल्हारुग्णालय व किरण बोरा (वय 55) या शेतकऱ्याला बारामतीमध्ये दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे साहय्यक निरीक्षक उत्तम भजनावळे उपोषणाच्या ठिकाणी तळ ठोकून बसले होते.
  • महिलांचा आज रास्तारोको
    गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू असूनही प्रशासन नीरा नदीमध्ये पाणी सोडत नसल्याने नदीकाठच्या गावातील महिला संतप्त झाल्या असून त्या सोमवारी (दि. 26) निरवांगी (ता. इंदापूर) येथे रास्तारोको आंदोलन करुन शासनाचा व प्रशासनाचा निषेध करणार आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)