पाण्यासाठी दिलेली आश्वासने हवेत

पिंगळी तलावात पाणी आलेच नाही

दहिवडी – माण तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. टंचाई घोषित होण्यासाठी एक महिना वेळ लागला. पुन्हा टंचाई घोषित होवून एक महिना देखील झाला, मात्र टॅंकर अजून देखील मंजूर झाले नाहीत. यामुळे या प्रश्‍नाचे कोणाला काही सोयरसुतक आहे की नाही, असा प्रश्‍न दहिवडीकर विचारत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या चार हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरने पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या शहराला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे त्यामुळे पाणीपुरवठा अपुरा होत असून दहिवडीवासीयांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंगळी तलावात पाण्याचे पूजन मोठ्या गाजावाजात झाले खरे, पण पाणी पिंगळी तलावात आलेच नाही. मग पाणी गेले कुठे..? असा ही प्रश्‍न आहे.

शहरात पाणी पुरवठा दहा ते पंधरा दिवस होत नाही, तसेच वाड्या वस्त्यावर ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. दहिवडी नगरपंचायतच्या चार हजार लिटरच्या टॅंकरने होणारा पाणी पुरवठा नागरिकांना कितपत पुरतो, याची जाणीव मात्र नगरपंचायत मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधींना झालेली नाही. वाड्या वस्त्यांवर टॅंकर महिन्यातून एकदाच येतो. त्याबरोबर शहरात देखील दहा ते पंधरा दिवस पाणी नळाला सोडले जात नाही. असा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत असेल, तर तो सोडवण्यासाठी काय केले जाते याची माहिती देणे आवश्‍यक झाले आहे.

पिंगळी तलावात पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव कालवा सल्लागार समितीकडे पाठवण्यात आला आहे. दि.25 डिसेंबरला तारखेला पाणी सोडण्यात येईल, मात्र याचे वीजबिल देखील भरणे गरजेचे आहे. पाच कोटी 52 लाख रुपये बिल थकीत आहे. आठ पंपामधील फक्त चार पंप चालू आहेत. त्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने सोडता येत नाही. सध्या पाणी खटावमध्ये येरळा धरणात सोडण्यात आले आहे
स्वप्नील पवार,
उपअभियंता, कृष्ण खोरे

दहिवडी शहराला दोन दिवसापूर्वी आठ टॅंकरचा प्रस्ताव मंजूर केला आहे. नगरपंचायतीने त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
दादासाहेब कांबळे,
प्रांताधिकारी, माण खटाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)