पाण्यावरून “कालवा’कालव

पाणी कपातीची माहिती नाही : शिवतारे


पुणेकरांना पुरेसे पाणी देणार : महापौर

पुणे – ऐन नवरात्रोत्सवात पुणेकरांवर पाण्याचे संकट ओढावले आहे. कालवा समिती बैठकीत ठरल्यापेक्षा जास्त पाणी महापालिका उचलत असल्याचा ठपका ठेवत पाटबंधारे विभागाने गुरूवारी खडकवासला धरणक्षेत्रात पंपांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. पण, या प्रकाराची माहिती नसल्याचा पवित्रा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला. तर, दुसऱ्या बाजूला पुणेकरांना पुरेसे पाणी देणार अशी घोषणा महापौर मुक्‍ता टिळक यांनी केली आहे. त्यामुळे ऐन उत्सवात पाण्यावरून “कालवा’कालव सुरू असल्याचे चित्र आहे.

पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच
मागील आठवड्यात कालवा समिती बैठकीनंतर पालकमंत्री बापट यांनी “पुण्याच्या पाण्यात कोणतीही कपात होणार नाही. पुणेकरांना दोन वेळा पाणी मिळेल’ असे सांगितले होते. मात्र, आता अचानक पाटबंधारे विभागाने 1,150 एमएलडीवर पाणी देण्यास नकार देत थेट बुधवारी कारवाई केली. त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा गेली कोठे? असा सवाल विरोधीपक्षांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

-Ads-

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : महापौर
शहरासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यापूर्वी महापालिकेस कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. अशा प्रकारे शहराला वेठीस धरणे चुकीचे असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जलसंपदामंत्र्यांकडे करणार, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेस पूर्ण वर्षभर 1,350 एमएलडी पाण्याची गरज असून तेवढेच पाणी महापालिकेस मिळावे, यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होणार असल्याचेही टिळक यांनी स्पष्ट केले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, प्रवीण गेडाम यावेळी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या, “कालवा समितीमध्ये पुणे शहराला 1,150 एमएलडी पाणी देण्याबाबत चर्चा झाली आहे. त्याची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. असे असताना, कोणतीही कल्पना न देता पाणी बंद केल्याने शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विजय शिवतारे तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वत: पाणी पूर्वीप्रमाणे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. तसेच दिवाळीपर्यंत हे पाणी दरदिवशी 1,350 एमएलडी द्यावे यासाठी पाटबंधारे विभागास पत्रही पाठविण्यात आले आहे. याशिवाय, पुणेकरांच्या पूर्ण वर्षभर दोन वेळ आणि पुरेसे पाणी दिले जाणार असून पाण्याबाबतच्या सर्व विषयांसाठी पुढील आठवड्यात जलसंपदामंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)