पाण्याला आडवे येण्या इतके आम्ही नतद्रष्ट नाही 

पद्मकांत कुदळे : कोपरगावला निळवंड्याचे पाणी मिळायलाच हवे; रोजगार घट चिंता वाढविणारी
कोपरगाव – “कोपरगाव राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांचे गाव आहे. येथील बाजारपेठ लोप पावल्याने गावाला गावपण उरलेले नाही. रोजगाराच्या संधी नसल्याने तरुण येथे थांबेनात. सध्या तरी पेन्शनर्सचे गाव झाले आहे. होय, मी रेशनवर पाणी दिले पण रडत बसलो नाही. मुंबईला लढलो, दोन तळे फुकटात मिळविले. पाण्याचे मोल मला आहे. पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पाणी कोणाला नको; आम्हालाही पाणी हवे. मग, ते निळवंडेतून येऊ देत किंवा अरबी समुद्रातून. कोपरगावच्या पाण्याला आडवे येण्याइतके आम्ही निश्‍चितच नतद्रष्ट नाही,’ असे सांगून निळवंडे पाण्याबाबत सकारात्मक भूमिका माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी मांडली.
पद्मकांत कुदळे यांनी येथील नगरपालिकेच्या विषयाबाबत नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांबाबत आपली भूमिका मांडली. लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीका करताना कुदळे म्हणाले की, “हम करे सो कायदा’ ही मानसिकता बदला. कानोसा घ्या; कारण खेडोपाडी लोकांची मानसिकता बदलली आहे. “प्रत्येक प्रश्‍नाकडे राजकीय म्हणून पाहू नका. कोपरगाव व्हिजन सोडा. किमान भले तरी करा. आता चिखलफेक सोडा, कामे करा. लोक चुका विसरतील. जाहिराती करा पण रिझल्ट तर द्या,’ असा चिमटा त्यांनी घेतला.
आ. कोल्हे यांच्या नगरपालिका आढावा बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, गेल्या दीड-दोन वर्षांपासून एकमेकांवर टीका, आरोप करून टोलवाटोलवी चालू आहे. शहराच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाले आहे. नगरपालिका म्हणजे आमदार, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या करमणुकीचे साधन झाले आहे. शहरविकास शून्य व प्रगती शून्य झाली आहे. कामांचा गवगवा केला जातो. मग रस्ते, तळे, पाणी, कत्तलखाना, आदींसह मूलभूत प्रश्‍न प्रलंबित राहतात. निधी वापरत नाही. जूनमध्ये निधी परत जाण्याची नामुष्की ओढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गटनेते विरेन बोरावके यांनी चौथा साठवण तलाव व लक्ष्मीनगर अंतर्गत मुख्य रस्ता रखडलेल्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. कृष्णा आढाव यांनी 42 कोटींची पाणी योजना अपूर्ण का? कोणाच्या मेहेरबानीने रखडली. फिल्टर प्लॅन्ट सुरू झाला, मग पाणी अशुध्द का? असे प्रश्‍न उपस्थित केले. संतोष चवंडके यांनी तलाव व कत्तलखाना यासाठी तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी 2011 साली निधी दिला; ती कामे अपूर्ण आहेत याकडे लक्ष वेधले. दिनार कुदळे म्हणाले की, कोपरगावातून लोक स्थलांतरित होत आहेत. मंदार पहाडे व हिरामण कहार यांनीही चर्चेत भाग घेतला. या वेळी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी हजर होते. अरुण जोशी यांनी आभार मानले.
जनतेसाठी रस्त्यावर उतरून जाब विचारू
नगराध्यक्ष वहाडणे यांच्याविषयी कुदळे म्हणाले, “”आशुतोष काळे यांनी नगराध्यक्षांना विकासाला साथ द्या, असा सबुरीचा सल्ला दिला. तो आजपर्यंत आम्ही ऐकला, आता नाही. आता लोक प्रश्‍न विचारतात. प्रभागातून घरी जाताना नगरसेवकांना अंधारातून जावे लागते. त्यांना चेहरा लपवावा लागतो. रडणार नाही तर रडवू, ही दु:खाची नाही तर चीड व संतापाची आग आहे. यापुढे तुम्हाला आम्हाला व जनतेला हवे तेच करू. रस्त्यावर उतरून जाब विचारू,” असे सांगत आता जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढण्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)