पाण्याची चिंता मिटली!

मावळातील धरणे काठोकाठ : आंद्रा, पवना धरणाची “सेंच्युरी’

पिंपरी – गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्‍यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. परिसरातील आंद्रा आणि पवना धरणाने “सेंच्युरी’ गाठली, तर वडिवळे आणि कासारसाई धरणे काठोकाठ भरली आहे. पाणलोट क्षेत्रातील “श्रावण सरीं’मुळे जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्यामुळे पवना धरणातून 3350 क्‍युसेक विसर्ग सुरू झाल्याने पवनामाईचे भरभरून वाहणारे रुप दृष्टिस पडत आहे. छोट्या धरणांसह पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मावळ तालुक्‍यासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे पवना धरण “ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्यामुळे धरणातून नदी पात्रात शनिवारी 2208 वरून रविवारी (दि. 12) सकाळी 3350 क्‍यूसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना, आंद्रा, कासारवाई, वडिवळे या प्रमुख चार धरणांतून मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्‍यांना पाणीपुरवठा होतो. याशिवाय आवश्‍यकतेनुसार अन्यत्र पाणीपुरवठा वळविला जातो.

देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या वडिवळे धरण परिसरात या हंगामातील 2613 मि.मी. इतका मावळ तालुक्‍यातील सर्वाधिक पाऊस पडला. 1.05 टीएमसी पाणीसाठा असलेल्या या धरणाचा 98.19 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. 2.92 टीएमसी एवढा पाणीक्षमता असलेले आंद्रा धरण शंभर टक्‍के भरले असून, 82.75 दक्षलक्ष घनमीटर इतका उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. या धरण परिसरात 738 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्‍यांची तहान भागविणारे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. 8.51 टीएमसी उपयुक्‍त साठा असलेल्या हे धरण तुडूंब भरले आहे. सततच्या पावसामुळे धरणातून 3350 क्‍यूसेक पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. “पवना’च्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर असून, यंदाचा 2364 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचा विसर्ग कमी-अधिक केला जाईल, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वडिवळे धरणाची गळती थांबणार…
वडिवळे धरण 1978 मध्ये बांधण्यात आले असून, धरणाची पाणी क्षमता 1.44 टीएमसी आहे. तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहूला वडिवळे धरणातून पाणीपुरवठा होतो. या धरणातून गळती होत असल्याचे जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आले आहे. गळतीमुळे धरणास कोणताही धोका नसला तरी गळती रोखण्यासाठी राज्य सरकारने दुरुस्तीच्या कामासाठी तातडीने मंजुरी दिली आहे. चाळीस वर्षे जुने असलेल्या या धरणात यंदा एक टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. या धरणामुळे मावळ परिसरातील सुमारे सहा हजार हेक्‍टर परिसर पाण्याखाली आला आहे. आळंदी, देहू सारख्या तीर्थक्षेत्रांसाठी या धरणातून पाणी पुरविण्यात येते, त्यामुळे हे धरण प्रमुख मानले जाते.

मावळमधील एकूण धरणे
भूशी (रेल्वे), तुंगार्ली (लोणावळा नगरपरिषद), वलवण, शिरोता, उकसान, आंद्रा, ठोकळवाडी, पवना, मळंडी फुले, कासारसाई, वडिवळे.

प्रमुख धरणे आणि सध्याचा पाणीसाठा (टक्‍केवारी)
वडिवळे : 98.19
आंद्रा : 100
पवना : 100
कासारसाई : 95.77

पवना धरण शंभर टक्‍के भरले आहे. पवनाधरण पाणलोट क्षेत्रात दुपारी दोननंतर पावसाचा जोर ओसला आहे. पण पाण्याचा निसरा थांबलेला नाही. त्यामुळेच धरण साठ्यात वाढ होत आहे. रविवारी धरणातून 3350 क्‍यूसेक पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. धरणातील पाणीसाठ्याकडे बारकाईने लक्ष ठेवत योग्य ते निर्णय घेतले जातील.
– ए. एम. गदवाल,
शाखा अभियंता, पवना धरण.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)