पाण्याचा पैसा

    संस्कार

  अरुण गोखले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन गावांच्या मधून एक नदी वाहात होती. नदीच्या या काठावर एक गाव होत तर दुसऱ्या काठावर दुसरे. सखाराम गवळी नदीच्या पैलतीरावर राहात होता. तिथं त्याच छोटसं घर होत. शेत होत. अंगणात गोठा होता. गोठ्यात दहा-बारा गाई -म्हशी होत्या. त्यांचे दूध तो त्या अलीकडच्या गावात नेऊन विकायचा. त्या मोठ्या गावात त्याची काही बांधलेली गिऱ्हाईक पण होती.

एकूणच काय! तर सखारामाच ठीक चाललं होत. पण जे आणि जेवढं मिळेल त्यात तो सुखी आणि समाधानी नव्हता. त्याला असं वाटायच की आपल्याला भरपूर पैसे मिळाले पाहिजेत. या लोभापायीच त्याला एक फार वाईट सवय लागली होती. तो काय करायचा? जास्त पैसे मिळावेत म्हणून नदीतून जाताना नाव मध्यावर गेली की कोणी पाहात नाही ना? याची खात्री करून घेत दुधात नदीचं पाणी मिसळायचा, आणि ते दूध विकून पाण्याचा पैसा करायचा. त्याचा हा असा कारभार अनेक दिवस चालू होता.

एकदा काय झालं सखारामाच्या लेकीचं लग्न ठरलं. त्याने जमा केलेल्या पैशातून लेकीसाठी दागिने, नवे कपडे, काही छान छान वस्तू खरेदी केल्या. बरीच खरेदी करून नावेतून तो आपल्या घराकडे परत निघाला. तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्याची नाव डगमग़ू लागली. एका क्षणी ती एका मोठ्या लाटेबरोबर इतकी तिरकी झाली की सावरेसावरेपर्यंत सखारामाचे चीजवस्तूंचे गाठोडे नदीत पडले. त्याने प्रयत्न केला, धडपड केली पण त्याच्या हाताला स्वत:चा जीव वाचविण्याशिवाय काही लागले नाही. आपलं धन गेलं, पैसा गेला म्हणून तो नदीकाठावर शोक करू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले. “सखाराम! काय झालं, तू असा रडतोस का?’

त्याने आवाजाचा कानोसा घेतला. कारण त्याच्याशिवाय दुसरं तर कोणीच नव्हत.. मग हा आवाज कोणाचा? त्याने आवाजाच्या रोखीने पाहिले. त्याला मोठे आश्‍चर्य वाटले. कारण तो आवाज नदीच्या पाण्यातून येत होता. म्हणजे ती नदीच त्याच्याशी बोलत होती. हळूहळू तो आवाज त्याला अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. सखारामाची कानउघाडणी करीत नदी त्याला म्हणत होती, “सखाराम, अरे तू आता कशासाठी रडतो आहेस. कालपर्यंत खोटेपणाने वागताना, दुधात पाणी मिसळून लोकांना फसवताना तुला बरं वाटत होत ना? आपण लोकांना फसवतोय ह्याची तुला जराही खंत वाटत नव्हती, उलट तसं करताना तुला मजा वाटत होती. होय ना? हे बघ, जसं करावं तसं भरावं लागत. तू आजवर लोकांना फसवून पाण्याचा पैसा करत आलास ना? तो पाण्याचा पैसा पाण्यात वाहून गेला. दुसरं काय! सखारामास त्याची चूक कळली पण फार उशिरा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)