पाण्याअभावी ज्वारीचे उत्पादन घटणार

एकरी फक्त दोन क्विंटल उत्पन्न निघण्याची शक्‍यता

वाई – वाई तालुक्‍यात अत्यल्प पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालाच नाही. निर्सगाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसलाच. परंतु, रब्बी हंगामसुध्दा पुर्णपणे धोक्‍यात आला आहे. सध्या ज्वारीचे पीक जोमात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र पिकांना पाणीच देता न आल्याने ज्वारीची उंची खुंटणार आहे. कणसात दाणाच भरला नाही तर ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट होणारे चित्र सध्या वाई तालुक्‍यात पाहवयास मिळत आहे. तालुक्‍यातील सर्वच भागातून ही परिस्थिती पहावयास मिळत आहे. पिकांना पाणी उपलब्ध न झाल्याने ज्वारीच्या पिकाची अवेळी काढणी करावी लागण्याची शक्‍यता आहे. एकरी दोन ते तीन क्वींटल ज्वारीचे उत्पादन निघण्याची खात्री बळीराजाला नाही. जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न काही अंशी सुटला असला तरी माणसांच्या पोटाचे काय? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना सध्या भेडसावत आहे.

या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या संबंधीत विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. वाई तालुका उस, हळद, आले, स्ट्रॉबेरी या पिकांबरोबर चांगल्या पध्दतीची ज्वारी पिकविण्यात अग्रेसर आहे. ज्वारीच्या विविध प्रकारच्या जाती घेतल्या जातात दगडी, मालदांडी व इतर संकरीत वाणांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. व्याजवाडी, ओझर्डे, खानापूर, कवठे ते वेळे महामार्गाच्या संपूर्ण पट्ट्यात ज्वारीच्या पिकांचे चांगले उत्पन्न घेतले जाते. या गावांमधील कालव्यांच्या जवळ असलेल्या जमिनीत नगदी पिके घेतली जातात तर इतर ठिकाणी ज्वारीचे पिक विहीरीच्या पाण्यावर आवलंबून असते. पावसाच्या अनियमिततेमुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. या पुढे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडाच पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

तालुक्‍याच्या पूर्व भागात कित्येक गावांमध्ये सध्या आठवड्यातून फक्त दोन वेळाच पाणी येते. तसेच वाईच्या पश्‍चिम भागाची परस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. धोम धरण व बलकवडी धरणावर असणाऱ्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या स्कीम पूर्णपणे बंद आहेत. समोर धरणात दिसणारे पाणी काही किलो मिटर अंतर वाहून पिण्यासाठी न्यावे लागते. पश्‍चिम भागामध्ये भाताच्या पिकालाच लागणारे पाणी पुरेसे मिळाले नाही. तर ज्वारीच्या पाण्याचा प्रश्‍नच येत नाही त्यातूनसुध्दा पसरणी, मेणवली, भोगाव, पांडे, धोम या गावांमध्ये पाण्याचा स्त्रोत चांगला असल्याने ज्वारीचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात घेतले जाते.

परंतु पावसाने ओढ दिल्याने याही गावातील ज्वारीचे पिक तसे धोक्‍यातच आलेले आहे. एकदरीत संपुर्ण तालुक्‍यामध्ये खरीप हंगाम पावसाच्या लहरी पणामुळे वाया गेला त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिके ज्वारी, हरबरा, गहु ही पिके ही धोक्‍यात आली आहेत. याही पिकांना वातावरणाचा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. संबंधीत कृषी विभागाने तालुक्‍यातील दृष्काळजन्य भागातील सर्व्हेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)