पाणी हे मन जोडणारी पवित्र गोष्ट

खटाव येथील कार्यक्रमात सत्यजित भटकळ यांचे प्रतिपादन

खटाव – अमिर खान हे फिल्म ऍक्‍टर,डॉ.पोळ हे डेंन्टीस्ट आणि मी स्वतः सत्यजीत भटकळ दिग्दर्शक. आमचा एकमेकांशी संबंध कधी आलाच नसता पण तो संबंध आणला पाण्याने. तेव्हाच मनोमन खात्री पटली की पाणी हे मन जोडणारी पवित्र गोष्ट आहे आणि या पाण्याच्या माध्यमातूनच गावंच्या गावं एकत्र आणायचे,’असे प्रतिपादन सत्यजित भटकळ यांनी केले.

कटगुण ता. खटाव येथील ग्रामस्थांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून हाती घेतलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांची पहाणी आणि श्रमदात्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भटकळ आणि डॉ.अविनाश पोळ आले आसता ते बोलत होते.

भटकळ पुढे म्हणाले,’ दिवसेंदिवस मानव स्वकेंद्रीत आणि हव्यासी बनत चालला आहे. त्याला केवळ आपल्या गरजा कशा भागतील एवढीच काळजी आहे. त्या भागवण्यासाठी तो वेळ प्रसंगी पशू,पक्षी,झाडं,किडे,मुंग्या,मधमाशा या जैवविविध घटकांचे अस्तित्वच विसरला. या जैवसृष्टीला मानवाने संकटात आणले. जैवविविधतेमधील जेवढ्या जातीप्रजाती मानवाने नष्ट केल्या नसतील तेवढ्या इतर कोणीही नष्ट केल्या नाहीत. पाणी फौंडशेनची चळवळ आहे ती या दुष्टचक्राला बदलण्यासाठीची आहे. आणि हे बदलण्याचे काम देखील आपणच करणार आहोत फक्त आपल्यात असलेल्या विधायकतेची जाणिव करून देण्याचे काम तुम्हा श्रमदात्यांना हाताशी घेऊन डॉ.अविनाश पोळ, अमिर खान आणि मी करत आहोत. आपल्याला परत निसर्ग मातेला शरण जायचे आहे. आपण तिचा पिडीजात खुप छळ केला आहे. तिची जोपासना सातत्याने करयाची आहे. त्या बदल्यात निसर्ग माता आपले जीवन सर्वार्थाने समृध्द करणार आहे. हे काम करत आसताना आपण सर्व ग्रामस्थ मनाने एकत्र आलेलो आसतो.मनातील कटुता,भेदभाव,द्वेष या विषारी भावनांचे आपोआप निराकारण झालेले आसते.म्हणूणच पाण्यावर काम करणे ही आत्ताच्या काळात निसर्ग पूजा हीच ईश्वरपूजा आहे.’

या वेळी डॉ.अविनाश पोळ आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले,’मनाने,राजकारणाने,जातीपातीने दुंभगलेली अनेक गावात ऐक्‍याचे वारे वाहतंय आणि हे केवळ आणि केवळ शक्‍य झाले ते पाण्यामुळेच. गावांगावांमध्ये श्रमदानासाठी निरपेक्ष भावाने अबालवृध्द श्रमदान करत आहेत याचा अर्थ समाजात अद्याप चांगुलपणा टिकून आहे. समाजासमोर जर तुम्ही चांगला विचार घेऊन गेलात तर समाज त्या विचाराला नक्की पाठबळ देतो. याचाच अर्थ माणसाला चांगले हवय. चांगल्या विचारांची पेरणी केली तर पिक देखील चांगले येणार आहे. आपल्याला शाश्वत सुख हवे असेल तर पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षतोडीमुळे तापमानात प्रचंड वाढ होत चालली आहे. माळंच्या माळं उजाड होऊ लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या जवळ जायचे आहे.जो पर्यंत माणूस निसर्गाशा जोडला जात नाही तो पर्यंत तो आतून बाहेरून बदलणार नाही. वॉटर कप स्पर्धा ही निमित्त आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने माणूस एकत्र आला आहे. ही एकत्र येणारी शक्ती उद्याचा महाराष्ट,उद्याचा देश घडवणार आहे.गावांनी काम वॉटर साठी करावे कपासाठी नव्हे. कप देण्याचे काम ईश्वर करणार आहे. तुम्ही भांडी तयार करा. पाण्याच्या रुपात मुबलकता येणार आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)