पाणी, रस्ता, कचऱ्याचे प्रश्‍न तातडीने सोडवा !

हिंजवडी : नागरी समस्यांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना खासदार सुप्रिया सुळे व उपस्थित पदाधिकारी आणि अधिकारी.
  • खासदार सुळे यांच्या सूचना ः हिंजवडी व माण भागातील सहा गावांवर चर्चा

हिंजवडी (वार्ताहर) –हिंजवडी व माण भागातल्या सहा गावांचा पाणी, रस्ते आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा, असे आदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक शेतकरी, मुळशी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्वच्छ या संस्थेशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा, अशी सूचनाही सुळे यांनी केली.

यावेळी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, ग्रामपंचायत पदाधिकारी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमारडीए आणि मुळशी तालुका प्रशासनातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. हिंजवडीसह माण, चांदे, नांदे, मारुंजी आणि म्हाळुंगी या सहा गावांना सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी मुळशी प्रादेशिक पाणी योजना किंवा वाकड येथील मांगीरबाबा पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेण्याबाबत नियोजन करावे, अशी उपाय योजना सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना सुचवली.

-Ads-

यासोबतच हिंजवडी ते म्हाळुंगे, चांदे-नांदे ते म्हाळुंगे आणि वाकड येथील शिवाजी चौक या भागातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. त्यासाठी भूसंपादन आवश्‍यक असल्याने स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा. त्यांना योग्य मोबदला मिळावा याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे तातडीने योग्य तो मार्ग काढून लवकरात लवकर काम सुरु करावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या सहा गावांतील कचरा टाकण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून भेडसावत आहे. तो सोडविण्यासाठी नव्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी. त्यासाठी येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी त्यांची वेळ घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

येत्या गुरुवारी (दि.26) ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत असोसिएशनने बैठक घ्यावी, असेही सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत सुचविले. याशिवाय, वाहतूक सुधारणा, सिग्नल यंत्रणा, पीएमपी संबंधित प्रश्न, सुरक्षा आदींबाबतही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मुळशीच्या सभापती कोमल साखरे, माजी सरपंच सागर साखरे यांच्यासह शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी कर्नल चरणजीतसिंग भोगल, केदार परांजपे, ऋचा आंबेकर, अनिल पटवर्धन, उन्मेश भतीजा, रत्नपारखी, मृणाल शिवले, शंकर साळकर यांच्यासह काही सोसायट्यांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

नगरसेवक विशाल तांबे करणार मदत
कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यासाठी नगरसेवक विशाल तांबे यांनी बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. तो प्रकल्प हिंजवडी भागातही राबविण्यासाठी चाचपणी सुरु आहे. शिवाय सुक्‍या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही काही संस्था संपर्कात आहेत, त्यांच्याकडून मदत घेऊ असे आश्वासन तांबे यांनी हिंजवडीवासीयांना या बैठकीत दिले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)