पाणी बळी ; पाण्यासाठी शासन आणखी किती बळी घेणार ?- शेतकऱ्यांचा सवाल

रोहन मुजूमदार 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर पाटबंधारेच्या कारभारावर ताशेरे

पुणे- नीरा डाव्या कालव्यातून दोन वर्षांपासून वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिके जळून गेल्याने इंदापुर तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. इंदापुरातच नीरेच्या कोरड्या पात्रात शेतकऱ्यांचे आंदोलन, मंडण आंदोलन यासह निवेदने, मार्चा यातून शेतकऱ्यांचा संताप दिसून आला. त्यातच शेतीच्या नुकसानीतून वाढलेल्या कर्जाच्या बोजातून इंदापूर बॅंकेचे संचालक तथा बेलवाडी येथील शेतकरी वसंत पवार यांनी आत्महत्या केल्याने इंदापुरात शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न पेटला आहे. नदी, कालव्यात पाणी सोडण्याकरिता शासन किती शेतकऱ्यांचा बळी घेणार? असा संतापजनक सवाल शेतकरी करू लागले आहेत.

इंदापूर तालुक्‍यावर पाण्याबाबत गेल्या तीन ते चार वर्षांपासून कायमच अन्याय होत आहे. धरणात पाणी असूनही शेतीसाठी पाणी मिळत नाही, ही मोठी शोकांतीका आहे. पाण्यासाठी तालुक्‍यात 20 ते 25 मोठी आंदोलने झाली, तरीही प्रशासनाला पाझर फुटत नाही. दरम्यान, शेतकरी तथा इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांना पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते, हे खेदजनक आहे. पवार यांच्या आत्महत्येस शासन, प्रशासनच जबाबदार आहे.
– हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री

पुणे जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने सर्व धरणे “ओव्हरफ्लो’ झाली होती, त्यामुळे यंदा आपल्याला वेळेवर आणि मुबलक पाणी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, ती मार्च महिन्यांतच फोल ठरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कालव्याच्या गळतीमुळे व सायफनद्वारे पाणी चोरीमुळे नियमीत पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसून त्यांच्या डोळ्यादेखत पिके जळत असल्याचे चित्र बहुतांशी तालुक्‍यात आहे. इंदापूर तालुक्‍यात तर पाणी प्रश्‍न विविध घटनांमुळे पेटला आहे.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील सुमारे सात हजार एकरांवरील पिके धोक्‍यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असताना पाटबंधारे विभाग ढिम्म आहे.
दरम्यान, नीरा नदीत पाणी सोडावे यामागणीसाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथील कोरड्या नदी पात्रात शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात सलग आठ दिवस बेमुदत आंदोलन केले होते. मात्र, या शेतकऱ्यांशी कोणतीही चौकशी न करता किंवा सकारात्मक आश्‍वासन न देता त्यांना उपोषण सोडण्यास सरकारने भाग पाडले, त्यातच नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडले होते. मात्र, पाटबंधारे विभागाचा ढीसाळ कारभार आणि अपूर्ण कामे यामुळे हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचू शकले नाही, त्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील उन्हाळी पिके डोळ्यादेखत होरपळली आहे.

मंत्र्यांची पोलीस चौकशी करणार का?
बेलवाडी येथील शेतकरी तथा इंदापूर बॅंकेचे संचालक वसंत पवार यांनी पाणी न मिळाल्याने शेतीचे नुकसान झाले, यातून कर्ज ओझे झाल्याने आत्महत्या केली. त्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्य जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांची नावे नमूद केली आहेत. मात्र, हे दोघे मंत्री असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव येणार यामुळे पोलीस या दोघा मंत्र्यांची चौकशी करून पवार यांना न्याय देणार का? याबाबत तालुक्‍यात चर्चा आहे.

राजकीय नेते, पदाधिकारी असमर्थ?
नीरा नदीत अवघे एक टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथे कोड्या नदीपात्रात शेतकऱ्यांचे आठ दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी सर्वत्र पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी येथे भेट देवून पाणी आणूच, असे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, सरकारने एकाही नेत्यासमवेत अथवा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता पाणी सोडता येणार नाही, असे जाहीर करून टाकले. इंदापूर तालुक्‍यातील राजकीय नेत्यांसह पदाधिकारी इंदापूरला हक्काचे पाणी मिळवून देण्यास असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)