पाणी देता येत नसेल, तर खूर्ची खाली करा! , हर्षवर्धन पाटील यांचे आमदार भरणेंना प्रत्यूत्तर

बावडा: आमदार हेच कालवा सल्लागार समितीचे अधिकृत व जबाबदार सदस्य असतात. त्यामुळे कालवा सल्लागार समितीचा सध्या मी सदस्यही नाही. विद्यमान आमदारांना जर आपल्या पदाचा वापर करून इंदापूर तालुक्‍यातील शेतीला पाणी देता येत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी, मी शेतीला पाणी आणण्याची जबाबदारी घेतो. स्वत:ची निष्क्रियता व अपयश झाकण्यासाठी व जबाबदारी झटकण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, असे म्हणून जनतेची दिशाभूल करू नका. तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय असते याचा थोडा अभ्यास करा, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता आज (शनिवारी) लगावला आहे.

इंदापूर तालुक्‍यात शुक्रवारी (दि. 5) झालेल्या सभांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थित राहत नाहीत, अशी जाहीर सभांमधून टीका केली होती, या टीकेस आज कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

-Ads-

हर्षवर्धन पाटील म्हणले की, जलसंपदाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस प्रतिनिधी पाठवा म्हणून प्रत्येक कारखान्याचे नावे पत्र पाठवून निमंत्रण दिले जाते. त्यानुसार प्रत्येक संस्था आपला प्रतिनिधी पाठवित असते. त्यानुसार कर्मयोगी कारखान्याने प्रत्येक बैठकीस आपला प्रतिनिधी पाठवला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, माजी मंत्र्यास कालवा सल्लागार समितीचे निमंत्रण नसते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कालवा सल्लागार समितीची मुंबईत गुरूवारी (दि.4) बैठक झाली. या बैठकीला इंदापूर व बारामतीचे दोन्ही आमदार सदस्य म्हणून उपस्थित होते. या बैठकीत इंदापूर तालुक्‍यातील शेटफळ तलाव, तरंगवाडी ते मदनवाडी तसेच इतर तलाव, नीरा व भीमा नद्यांवरील बंधारे भरून घेण्यासाठी कोणते निर्णय घेण्यात आले व त्यात तुमची भूमिका काय होती, याची माहीती लोकप्रतिनिधीने इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना द्यावी.तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधीची शेतीला पाणी देणेची जबाबदारी असते. मी 5 वर्षे युतीचे व 15 वर्षे आघाडीचे शासन असताना इंदापूर तालुक्‍यातील शेतीला हक्काचे पाणी नियमितपणे मिळवून दिले. कॅबिनेट मंत्री होतो व आमदारही होतो म्हणून 20 वर्षे हक्काचे पाणी इंदापूर तालुक्‍यात येत होते.जर मी पदावर नसतो तर यांनी खाली पाणी येऊ दिले असते का? याचेही उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता दिले आहे.

अजित पवरांवर टीका

मुंबई येथे झालेल्या कालवा समिती बैठकीत माजी उपमुख्यमंत्री हे इंदापूर तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात एकही शब्दही बोलले नाहीत. तरीही इंदापूर तालुक्‍यात आल्यावर मीच पाणी देत होतो, अशी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मग गेल्या 4 वर्षे त्यांनी शेतीला पाणी का दिले नाही ? वीर धरणातून नीरा नदीत सोडलेले पाणी वाहून वाया गेले; परंतु बारामती व इंदापूर तालुक्‍यातील बंधाऱ्यात लोकप्रतिनिधींनी का अडविले नाही. दोनही तालुक्‍यात बहुतेक बंधाऱ्यांचे ढापे नादुरूस्त आहेत ते जलसंपदा खाते सांभाळणाऱ्यांनी कधी दुरूस्त का केले नाहीत ? अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.

 शेजारच्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये

इंदापूर तालुक्‍यातील 22 गावातील शेतकऱ्यांसाठी युती शासनाच्या काळात विधानसभेचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली विनंती अर्ज समितीला या 22 गावांमध्ये आणले. त्यानंतर विधिमंडळाच्या सभागृहात 22 गावांमधील शेतीला 7 नंबरवरती 20 गुंठे क्षेत्रास बारमाही पाणी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे 20 वर्षांपासून 22 गावांमधील शेतीला हक्काचे पाणी मिळत आहे. गेल्या 4 वर्षात इंदापूर तालुक्‍यातील शेतीचे पाण्याअभावी मोठे नुकसान झाले आहे. या चार वर्षांनंतर इंदापूर तालुक्‍याच्या पाणी प्रश्‍नावर बोलून शेजाऱ्यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये,असे मत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)